रिल काढला एकाने जीव गेला दुसऱ्याचा; बाईक डोक्यात पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Varanasi Accident : वाराणसीमध्ये रविवारी पुलाच्या दुभाजकाला धडकून दुचाकी खाली पडल्याने एका अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुण हा मित्रासह बाईकवरुन जात होता त्याचवेळी हा भीषण अपघात घडला. पोलिसांनी प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 18, 2023, 03:17 PM IST
रिल काढला एकाने जीव गेला दुसऱ्याचा; बाईक डोक्यात पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू title=

Shocking News : सध्या रिल्स (REEL) हे लोकांच्या मृत्यूचे कारण बनत आहेत. रिल्स काढताना मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. अशातच वाराणसीमध्ये (Varanasi) चालत्या बाईकवर बसून रिल्स तयार करणे एका निष्पाप तरुणाला चांगलेच महागात पडलं आहे. वाराणसीमध्ये रील बनवण्याच्या नादात रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाच जीव गेला आहे. वाराणसीतील पुलावर एक जोडपं चालत्या बाईकवर रील बनवत होते. अचानक त्यांचे बाईकवरील संतुलन बिघडले आणि ती दुभाजकावर आदळली. दोघेही दुभाजकावर पडले मात्र त्यांची बाईक पुलाच्या दोन लेनमधील अंतरातून 30 फूट खाली पडली. त्याचवेळी 25 वर्षीय कनिष्ठ अभियंता असलेला सर्वेश हा त्याच्या मित्रासह पुलाखालून जात होता. पुलावरुन बाईक थेट त्याच्या डोक्यावर पडली. यामुळे सर्वेशचा जागीच मृत्यू झाला. हा सगळा प्रकार पाहून रील बनवणाऱ्या दोघांनी तेथून पळ काढला.

वाराणसीमध्ये रविवारी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे वाराणसीतील शिवपूर येथील रिंग रोडवर हा अपघात झाला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून शिवपूर पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातानंतर सर्वेशचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र आणि प्रियकर हे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र प्रेयसी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच बेपत्ता झाली आहे. तिला फारशी दुखापत झाली नसल्याचे लोकांनी सांगितले. 30 फूटांवरुन बाईक सर्वेशच्या डोक्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

वाराणसीचा सर्वेश शंकर हा प्रयागराज येथील उत्तर-मध्य रेल्वेच्या इलेक्ट्रिकल विभागात कनिष्ठ अभियंता होता. रविवारी सुट्टीच्या दिवशी तो गावी आले होते. सर्वेश हा त्याचा मित्र आदित्य कुमारसोबत बाईकने दांडूपूर अंडरपास मार्गे शहरात येत होता. त्याचवेळी शिवपूर येथील शिवा जैस्वाल हा त्याच्या प्रेयसीसोबत बाईकवरुन जात होता. पाऊस पडत होता आणि दोन्ही बाईक वेगात होत्या. शिवा आणि त्याची प्रेयसी चालत्या बाईकवर रील तयार करत होते. त्यानंतर त्यांचे बाईकवरील संतुलन बिघडून ती दुभाजकावर आदळली. शिवा आणि प्रेयसी दोघेही पुलावरच पडले. मात्र बाईक पुलाच्या दोन लेनमधून खालून जाणाऱ्या सर्वेश आणि त्याच्या मित्राच्या अंगावर कोसळली.

डोक्याला गंभीर मार लागल्याने सर्वेशचा जागीच मृत्यू झाला. तर आदित्य दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाला. अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत दोघांनाही उचलण्याचा प्रयत्न केला. घाईघाईत पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आणि रुग्णवाहिकाही बोलवण्यात आली. सर्वेशचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर नातेवाईकांना माहिती देण्यात आली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

काही दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा

वाराणसीच्या शिवपूर येथील आऊटर रिंगरोडवर अपघाताचा बळी ठरलेल्या सर्वेशची 1 जुलै रोजीच साखरपुडा झाला होती. लंका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामना येथील एका कुटुंबात त्याचे लग्न होणार होते. लग्नाची तारीख ठरत असल्याने दोन्ही कुटुंबीयही  आनंदी होते. मात्र सर्वेशच्या मृत्यूची बातमी कळताच दोन्ही कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.