मुंबई : सिनेसृष्टीला व्हॅनिटी व्हॅन पुरवणाऱ्या मालकांनी एकत्र येत संपाची हाक दिली आहे. या सर्वाचा परिणाम सुरू असलेल्या सिनेमाच्या शूटींगवर पडतोय. सिनेस्टार्स, सहाय्यक कलाकारांना याचा त्रास सहन करावा लागतोय. व्हॅनिटी व्हॅन शिवाय सेलिब्रेटींना शूटींग उरकावी लागतेय. सिनेमाच्या शूटींग दरम्यान सेलिब्रेटी या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तयारी करत असतात. वॉशरूम पासून मेकअप पर्यंत त्यांच्या गरजेच्या सर्व वस्तू या व्हॅनिटी व्हॅनमध्ये असतात.
सिनेमाच्या शूटींग दरम्यान मोठ्या प्रमाणात व्हॅनिटी व्हॅनची गरज असते. मुख्य कलाकाराला स्वतंत्र व्हॅनिटी व्हॅन असते तर इतर कलाकांसाठी काही व्हॅनिटी राखीव ठेवलेल्या असतात. मुंबईत व्हॅनिटी व्हॅनचा व्यवसाय तेजीत आहे. सरकारने व्हॅनिटी व्हॅन संचालकांना लागणाऱ्या टॅक्समध्ये वाढ केली आहे. यामुळे व्हॅनिटी व्हॅन असोसिएशनने हा बंद पुकारला आहे.
यामुळे सिनेनिर्मात्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्रात या बंदमुळे सिनेमाच्या शूटींगवर परिणाम होताना दिसतोय. करण जोहरच्या बॅनरचा 'केसरी'
ते यशराजच्या 'शमशेरा' आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मरजांवा'पर्यंत सर्व सिनेमांच्या शूटींगमध्ये व्हॅनिटी व्हॅन नसल्याने अडचणी येत आहेत.
केसरीची शूटींग फिल्मसिटीच्या हॅलीपॅडवर होतेय. करण जोहरने तिथे दीड लाख खर्च करुन मेकअप रुम तयार करुन घेतलाय. पण यामध्ये टॉयलेट नाही. त्यामुळे 'टॉयलेट एक प्रेमकथा' चा हिरो असलेल्या अक्षय कुमारला विना टॉयलेट शूट कराव लागतंय. टॉयलेटसाठी त्याला जवळच्या स्टुडिओमध्ये जावं लागतंय. दैनिक भास्करने यासंदर्भात वृत्त दिलंय.
महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत दहा टक्के जास्त कर द्यावा लागतो असे व्हॅनिटी व्हॅन संचालकांचे म्हणणे आहे. प्रत्येक व्हॅनिटी व्हॅनला दर वर्षी बारा ते साडे बारा हजार रुपयांचा कर द्यावा लागतो. पण महाराष्ट्रात ही रक्कम वर्षाला सव्वा लाख रुपये आहे.