नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. दरम्यान एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेसाठी अजून रुजू झालेली नसल्यानं एक्स्प्रेसमध्ये कोणीही नसल्यानं कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेलं नाही. उत्तर प्रदेशातील टुंडला स्थानकापासून १५ किलोमीटरवर ही घटना घडली. भारतीय रेल्वेची बहुप्रतिक्षित 'ट्रेन-१८' (Train 18) किंवा ' वंदे भारत एक्सप्रेस'ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी हिरवा झेंडा दाखवला होता. यापूर्वी भारताच्या सर्वात वेगवान रेल्वेचे पंतप्रधान मोदींनी निरिक्षण केले आणि हिरवा कंदील दाखवून एक्सप्रेसचे उद्घाटन केले.
India gets the first Semi High Speed Train, 'Vande Bharat Express.' https://t.co/dSZLJaoWRY
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2019
वंदे भारत ही एक्स्प्रेस १७ फेब्रुवारीला प्रथम प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु होणार होती. त्याच तयारीसाठी ही एक्स्प्रेस वाराणसीहून दिल्लीकडे जात होती. रुळांवरुन जनावरं गेल्यानं एक्स्प्रेसची चाकं रुळांवरुन घसरल्याचं अभियंत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान एक्स्प्रेस पुन्हा रुळावर आणण्यात यश आले असून सकाळी एक्स्प्रेस पुन्हा दिल्लीला रवाना झाली आहे. इंजिनविरहीत असलेल्या या एक्स्प्रेसचा वेग ताशी १३० किलोमीटर आहे. ही रेल्वे चेन्नई इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्याची माहितीही यावेळी पंतप्रधानांनी दिली होती. 'मेक इन इंडिया' योजनेचं कौतुक करताना त्यांनी या रेल्वेने योजनेला योग्य दिशा दिल्याचंही त्यांनी म्हटले होते.
- वंदे भारत ही देशातील सर्वात पहिली इंजिनशिवाय चालणारी सर्वात गतिशील रेल्वे आहे
- ही रेल्वे 'मेक इन इंडिया' योजनेंतर्गत चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे.
- रेल्वेचे काही सुटे भाग मात्र परदेशातून आयात करण्यात आले आहेत.
- या रेल्वेत स्पेनहून मागवण्यात आलेले विशेष सीट लावण्यात आल्यात. या सीट ३६० डिग्री अंशात फिरू शकतात
- ही रेल्वे तयार करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
- या रेल्वेला ऑटोमॅटिक दरवाजे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- संपूर्ण रेल्वेत एसी उपलब्ध आहे
- या रेल्वेत १६ कोच असून एकावेळी या रेल्वेतून ११०० हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतात
- पहिल्या कोचमध्ये ड्रायव्हिंग सिस्टम लावण्यात आलंय तिथेच ४४ सीट देण्यात आलेत
- तर रेल्वेतील दोन एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये ५२ सीट असतील
- याशिवाय इतर कोचमध्ये ७८ प्रवाशांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.