बोगद्यातून 41 जणांना वाचवणाऱ्या 12 'रॅट मायनर्स'चा सामाजिक भेदभाव अधोरेखित करणारा सवाल; म्हणाले, 'आम्हाला कोण...'

Uttarkashi Tunnel Collapse : आम्हाला कोण लक्षात ठेवणार? जीवघेणं रॅट मायनिंग करत 'त्या' बोगद्यातून 41 मजुरांना वाचवणाऱ्या कामगाराचा केविलवाणा प्रश्न. दाहक वास्तव मन विचलित करणारं   

सायली पाटील | Updated: Dec 7, 2023, 12:04 PM IST
बोगद्यातून 41 जणांना वाचवणाऱ्या 12 'रॅट मायनर्स'चा सामाजिक भेदभाव अधोरेखित करणारा सवाल; म्हणाले, 'आम्हाला कोण...' title=
uttarkashi No one will remember us say rat miners in Himalayan tunnel accident

Uttarkashi Tunnel Collapse : नुकतंच उत्तराखंडच्या उत्तरेकडील भागात घडलेल्या बोगदा दुर्घटनेममध्ये 41 मजुर अडकून पडले आणि संपूर्ण देशातील नागरिकांच्या काळजात धस्स झालं. प्रयत्नांची शिकस्त करत अखेर या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आणि संपूर्ण देशभरात एकच जल्लोष झाला. या मोहिमेसाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकालाच देवदूत म्हटलं गेलं आणि खरंच त्यांनी तसं कामही केलं होतं. पण, या साऱ्यामध्ये 'त्या' 12 जणांचा मात्र विसर पडला. 

'सीएनएन'नं या मजुरांशी संवाद साधत त्यांच्या केविलवाण्या प्रश्नांना वाचा फोडली आणि समाजाती मानसिकता, एकंदर भेदभावाची वागणूक ही दाहक परिस्थिती समोर आली. अडकलेल्या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढतानाचा तो अंतिम क्षण सांगताना मुन्ना कुरेशी नावाचा खोदकाम करणारा कामगार म्हणाला, 'मला पलिकडून मजुरांचा आवाज आणि त्यांची बाहेर येण्यासाठीची उत्सुकता ऐकू येत होती. शेवटचा दगड हटवला आणि माझ्या काळजाची धकधक वाढली होती...' 

हेसुद्धा वाचा : मुंबईपासून अवघ्या 20 व्या मिनिटाला गाठा 'हे' नवं शहर; नेमकं Location आलं समोर 

कुरेशी त्या 12 मजुरांपैकी एक होता, ज्यानं आपला जीव धोक्यात टाकत 'रॅट होल मायनिंग' करत बोगद्यात अडकून पडलेल्या मजुरांचा जीव वाचवला होता. जवळपास तीन आठवड्यांहून अधिक काळासाठी हे मजुर बोगद्यात अडकले होते. जिथं एका लहानशच्या पाईपवजा गोष्टीतून त्यांना अन्न आणि ऑक्सिजनपुरवठा केला जात होता. मजुरांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आला आणि केंद्रीय यंत्रणांनीही सूत्र हलवली. परदेशी जाणकारांना पाचरण करण्यात आलं. पण, अखेर मुन्ना कुरेशी आणि त्याच्यासोबतच्या 11 कामगारांनी ही किमया करुन दाखवली. 

रॅट होल मायनर... दुर्लक्षित निपुण कामगार

rat hole miners अर्थात अशा घातक पद्धतीचं खोदकाम करणारी ही मंडळी देशातील निपुण पण दुर्लक्षित घटकांपैकी एक, ही शोकांतिका. चिंचोळ्या बोगद्यांतून जाऊन जमिनीखालून कोळसा काढणाऱ्या या कामगारांना फार कमी मानधन मिळतं हे दाहक वास्तव. पण, मागच्या काही दिवसांपासून मात्र त्यांच्या कामाची पद्धत चर्चेचा विषय ठरली होती. कारण, प्रयत्न किती केले गेले तरीही अंतिम यश मात्र या रॅट होल मायनर्सना मिळालं होतं. प्रत्यक्षात मात्र त्यांचे प्रयत्न किंबहुना हे मजुरही कोणाच्याही लक्षात राहिले नाहीत. 

बचाव मोहिमेनंतर अवघ्या दोन तासांतच पडला विसर 

उत्तरकाशीमधील बोगद्याच्या दुर्घटनेमध्ये यशस्वीरित्या मजुरांना बाहेर काढण्यात आल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रॅट होल मायनिंग करणाऱ्या मजुरांना प्रत्येकी 50000 रुपये ही बक्षीसपात्र रक्कम देण्याची घोषणा केली. पण, काही कामगारांना तर या रकमेची पुढील माहितीसुद्धा मिळू शकली नाही ही सद्यस्थिती. 

माध्यमांनी दिलेलं प्राधान्य वगळता आपले कोणीही आभार मानले नाही किंबहुना प्रशासनानं कोणत्याही प्रकारची मदतही केली नसल्याची बाब या मजुरांनी प्रकाशात आणली आणि सामाजिक भेदभाव मन हेलावून गेला. हे सारं आश्यर्याचा धक्का देणारं नव्हतं असं सांगताना, 'एक मजुर कायम एक मजुर असतो आणि तो मजुरच राहतो. आम्ही जे काही केलं आहे त्यामुळं आमची गरीबी तर मिटणार नाही', असं म्हणत याच ईर्शाद अन्सारी नावाचा मजुर म्हणाला आणि परिस्थितीचं गांभीर्य एका क्षणात अनेकांना खडबडून जागं करून गेलं.