Viral Video : पावसाचे दिवस सुरु होतात त्यावेळी प्रत्येकाचेच पाय पावसाळी सहलींच्या ठिकाणांकडे वळतात. राज्याच्या इतकंच नव्हे तर, देशाच्या विविध भागांमध्ये पावसादरम्यानच हे असंच चित्र असतं. ओथंबून वाहणारे जलप्रवाह आणि कडेकपारीतून खळाळत झाली येणारा आणि आपल्याला चिंब भिजवणारा धबधबा प्रत्येक वेळी हवाहवासा वाटतो. पण, या धबधब्याखाली भिजणं कितपत सुरक्षित आहे याचा विचार तुम्ही कधी केलाय का?
धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हीही जाण्याच्या विचारात असाल तर आधी सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहा. कारण, हा व्हिडीओ तुमचा थरकाप उडवू शकतो.
मागील काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये पावसानं हाहाकार माजवला आहे. ज्यामुळं या भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा परिस्थितीत पर्यटकांनीही या भागात येण्याआधी दोनदा विचार करावा असा इशारा स्थानिक प्रशासनानंही दिला. पण, काही अतीउत्साही पर्यटकांवर मात्र याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाहीये. कारण, त्यांचा हा उत्साहटच त्यांना संकटात टाकण्यास कारणीभूत ठरला आहे.
उत्तराखंडमुळं पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. इथं ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत असल्यामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. रस्त्यांवर दरडी कोसळल्यामुळं याचेही थेट परिणाम दिसून येत आहेत. उत्तराखंडमधील असाच एक व्हिडीओ चमोली पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. जिथं ते नागरिकांना धबधब्यांखाली न भिजण्याचं आवाहन करत आहेत.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये काही पर्यटक उंचावरून कोसळणाऱ्या एका धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. एका क्षणातच त्यांच्या या आनंदावर निसर्ग घाला घालताना दिसत आहे. कारण, कोणतीही कल्पना नसताना अचानकच त्यांच्यावर दगड आणि मातीचा लोट कोसळताना दिसत आहे.
बरसात के मौसम के दौरान पहाड़ो में झरनों के नीचे नहाने से बचें। pic.twitter.com/bY9Xs08zxw
— Chamoli Police Uttarakhand (@chamolipolice) August 20, 2023
दरड कोसळताक्षणीच तिथं किंकाळ्या आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, हे असं चित्र पाहता धबधब्याखाली भिजायला जावून जीव धोक्यात न घातलेलाच बरा.