उत्तर प्रदेश : नोटांची बंडलं पाहून तुम्हाला एखाद्या बँकेच्या स्ट्राँग रुममधली कॅश असावी असं वाटेल. पण हे घबाड उत्तर प्रदेशातल्या एका परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरात सापडलं आहे. 1-2 कोटी रुपये नाही, ही नोटांची बंडलं आहेत तब्बल 150 कोटी रूपयांची. कुणाचाही विश्वास बसणार नाही, इतका हा काळा पैसा कनौजमधील पियूष जैनच्या घरात सापडलाय. (uttar prdesh kanpur perfume trader piyush jain income tax and enforcement directorate)
केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जैनच्या घरावर छापा मारला. या छाप्यात नोटांच्या बंडलांनी भरलेली कपाटंच्या कपाटं अधिकाऱ्यांना सापडली. या नोटा इतक्या होत्या की मोजता मोजता कर्मचारी थकून गेले. अगदी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सिनेमासारखं. अखेर नाईलाज म्हणून नोटा मोजायला मशीन मागवावी लागली. तब्बल 24 तासाहून अधिक काळ नोटांची मोजदाद सुरू होती.
हा काळा पैसा ज्याच्या घरात सापडलाय तो पियूष जैन नक्की आहे तरी कोण, करतो काय, याबद्दल आपण जाणून घेऊयात.
कोण आहे पियूष जैन?
पियूष जैन हा उत्तर प्रदेशातल्या कनौजमधील परफ्यूम आणि पान मसाल्याच्या व्यापारी आहे. कनौज, कानपूर आणि मुंबईत त्याची कार्यालयं आहेत. त्याच्या जवळपास 40 हून अधिक कंपन्या आहे. बोगस कंपन्यांच्या माध्यमातून त्यानं मोठ्या प्रमाणात टॅक्स चोरी केल्याचा आरोप आहे.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे पियूष जैनचे अखिलेश यादव यांच्यासोबत अत्यंत निकटचे संबंध आहेत.'समाजवादी परफ्यूम' लॉन्च करण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे.
पियूष जैनच्या घरावर तसंच इतर ठिकाणांवर मारलेल्या छापेमारीतून आतापर्यंत 150 कोटी रूपये जप्त करण्यात आलं आहे. एका परफ्यूम व्यापाऱ्याकडे सापडलेली ही कोट्यवधींची माया पाहिल्यानंतर भ्रष्टाचाराचा सुगंध किती खोलवर पसरलाय याची कल्पना येईल.