सत्संग सोहळ्यात चेंगराचेंगरी, 116 जणांचा मृत्यू... महिला आणि लहान मुलांचा समावेश

Hathras News: उत्तर प्रदेशमधल्या हाथरसमध्ये एका सत्संग समारंभात अचानक चेंगराचेंगरी झाली. यात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार 27 जणांच्या मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 2, 2024, 10:08 PM IST
सत्संग सोहळ्यात चेंगराचेंगरी, 116 जणांचा मृत्यू... महिला आणि लहान मुलांचा समावेश title=

Hathras News: उत्तर प्रदेशमधल्या हाथरसमध्ये (Hathras) एक दुर्देवी दुर्घटना घडली आहे. एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 116 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा जास्त समावेश आहे. हाथरसमधल्या रतीभानपूरमध्ये (Ratibhanpur) एका सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रम सुरु असतानाच अचानक अफरातफरी उडाली. यावेळी चेंगराचेंगरी (Stampede) होऊन महिला आणि लहान मुलं चिरडली गेली. यात अनेकजण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी
रतीभानपूरमध्ये भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शेकडोच्या संख्येने भक्त सहभागी झाले होते. गर्दी आणि प्रचंड उष्णतेने अनेक भक्त बेशुद्ध पडले. त्यामुळे अफरातफरी माजली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशानस दाखल झाले. गंभीर अवस्थेत अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार सत्संग सोहळ्यात प्रचंड गर्दी होती. बाहेर पडण्याचा रस्ताही लोकांमुळे जाम झाला होता. त्याचवेळी भक्तांमध्ये धक्काबुक्की झाली. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून आपल्या आईचीही प्रकृती गंभीर असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. सत्संग संपल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. प्रत्येकाला एकाचवेळी बाहेर पडायचं होतं, असंही काही जणांनी सांगितलं.

116 जणांचा मृत्यू
एटाचे सीएमओ डॉ. उमेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्संग कार्यक्रमादरम्यान ही दुर्घटना घडली. डॉ. उमेश त्रिपाठी यांनी 116 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा अधिक समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिस आणि प्रशासनातर्फे बचावकार्य राबवण्यात आलं.
 
मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केलं दु:ख
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं म्हटलं आहे. तसंच अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले असून मदतकार्य वेगाने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. जखमींना योग्य उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच घटना नेमकी कशी घडली? दुर्घटनेत कोण दोषी आहे यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.