मुस्लिमांकडून बंदची हाक! पूजा परवानगीनंतर पहिलाच 'जुम्मे का दिन'; ज्ञानवापीला लष्करी छावणीचं स्वरुप

Uttar Pradesh Gyanvapi Complex Varanasi Security: ज्ञानवापी मशिदीमधील व्यासजी तळघरामध्ये कोर्टाच्या आदेशानंतर पूजा सुरुवात झाल्यानंतर आज पाहिलाच शुक्रवार असल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 2, 2024, 10:18 AM IST
मुस्लिमांकडून बंदची हाक! पूजा परवानगीनंतर पहिलाच 'जुम्मे का दिन'; ज्ञानवापीला लष्करी छावणीचं स्वरुप title=
मोठ्याप्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे

Uttar Pradesh Gyanvapi Complex Varanasi Security: ज्ञानवापी मशिदीमधील व्यासजी तळघरामध्ये कोर्टाच्या आदेशानंतर पूजा सुरु करण्यात आल्यानंतर अंजुमन इंतजामिया कमेटीकडून आज म्हणजेच शुक्रवारी बनारस बंदची हाक देण्यात आली आहे. आजचा मुस्लीम समाजासाठी शुक्रवारच्या पवित्र प्रार्थनेचा दिवस म्हणजेच जुम्मे का दिन असल्याने ज्ञानवापी मशिदीला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे. या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी सुरक्षारक्षक आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण वाराणसीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 3 जिल्ह्यांमधून अतिरिक्त कुमक ज्ञानवापी परीसरातील सुरक्षेसाठी मागवण्यात आली आहे.

बनारस बंदची हाक

व्यासजी तळघरामध्ये पूजेला परवानगी दिल्याच्या निर्णयाविरोधात अंजुमन मशीद इंतजामिया कमेटीकडून आज मुस्लीम परिसरामध्ये बाजार बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे. अंजुमन मशीद इंतजामिया कमेटीकडून लोकांनी आज दुकानं बंद ठेवावीत आणि शांततापूर्ण मार्गाने आपल्या परिसरामध्ये नमाज पठण करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. बनारस बंदची हाक देण्यात आल्याने पोलिसांनी अधिक बंदोबस्त ठेवला असून पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. गुरुवारीच शहरामध्ये पोलीस फोर्सने फ्लॅग मार्चही केलं. 3 कंपन्या पीएसी, आरएएफबरोबरच गाझीपूर, चंदौली आणि जौनपूरच्या पोलीस दलाच्या तुकड्यात यात सहभागी झालेल्या.

पोलिसांना देण्यात आले हे निर्देश

मुस्लिमांची संख्या अधिक असलेल्या परिसरामध्ये विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे. बाहेरुन मागवण्यात आलेल्या तुकड्यांबरोबरच पीएसी तुकड्यांनी या परिसरामध्ये गस्त घातली. अति संवेदनशील परिसरामध्ये आरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना छोट्या-मोठ्या सर्वच मशिदींबाहेर योग्य संख्येनं पोलीस कर्मचारी तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही धार्मिक स्थळांबाहेर गर्दी होता कामा नये याची काळजी घेण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले आहेत.

हायकोर्टात जाणार प्रकरण

व्यासजी तळमजल्यामध्ये पूजा करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर मुस्लीम पक्षाकडून या निकालाला इलाहाबाद हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आहे. या प्रकरणी आज सुनावणी होऊ शकते. हिंदू पक्षाकडूनही या प्रकरणी कॅव्हेट दाखल करण्यात आली असून आमचं म्हणणंही ऐकून घ्यावं असं सांगण्यात आलं आहे.