उत्तर प्रदेशमध्ये आज 'No Non-Veg Day'; योगी सरकारने दिले आदेश, कारण..

25th November 2023 No Non-Veg Day: उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यासंदर्भातील एक नोटीस जारी केली आहे. आज राज्यातील सर्व कत्तलखाने आणि मांसविक्री करणारी दुकाने बंद असतील. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 25, 2023, 08:32 AM IST
उत्तर प्रदेशमध्ये आज 'No Non-Veg Day'; योगी सरकारने दिले आदेश, कारण.. title=
योगी सरकारने जारी केलं नोटीफिकेशन

25th November 2023 No Non-Veg Day: उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 25 नोव्हेंबर 2023 हा दिवस 'नो नॉन व्हेज डे' म्हणून जाहीर केला आहे. योगी सरकारने हा दिवस जाहीर करण्यामागील कारण आहे साधू टी. एल. वास्वानी यांची जयंती. टी. एल. वास्वानी कोण होते? उत्तर प्रदेश सरकारने नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...

योगी सरकारने काय म्हटलं आहे?

योगी सरकारने जारी केलेल्या नोटीफिकेशनमध्ये यासंदर्भातील महिती देण्यात आली आहे. आज उत्तर प्रदेशमधील सर्व कत्तलखाने आणि मांसविक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. तसा आदेशच सरकारने जारी केला आहे. "आपल्या देशातील महान व्यक्तींच्या जयंत्या या अहिंसेचा दिवस म्हणून पाळल्या जाणार आहेत. महावीर जयंती, बुद्ध जयंती, गांजी जयंती आणि टी. एल. वास्वानी जयंतीच्या पार्श्वभूमीवर उत्त प्रदेश सरकारकडून नोटीस जारी केली जात असून राज्यातील सर्व कत्तलखाने या दिवसांना बंद राहतील," असं उत्तर प्रदेश सरकारच्या नोटीशीमध्ये म्हटलं आहे.

"साधू टी. एल. वास्वानी यांच्या जयंतीनिमित्त नोव्हेंबर 25, 2023 च्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवले जातील," असंही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या आदेशाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होईल यासंदर्भातील दक्षता घेण्याचे निर्देश सरकारने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

टी. एल. वास्वानी कोण होते?

साधू थानवरदास लिलाराम वास्वानी हे एक शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी मीरा मोहिमेची सुरुवात केली. वास्वानी यांचा जनेम 25 नोव्हेंबर 1879 साली हैदराबाद सिंध (सध्या पाकिस्तानमध्ये) येथील एका सिंधी कुटुंबामध्ये झाला होता. शिक्षणासाठी आणि महिलांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी वास्वानी यांनी अनेकदा आवाज उठवला. वास्वानी एक उत्तम वक्ते आणि लेखक होते. वास्वानी यांनी शाकाहारी भोजनाचा पुरस्कार केला. वास्वानी यांचा मृत्यू 16 जानेवारी 1966 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी झाला. त्यांच्या आयुष्यावर आधारित आणि त्यांच्या शिकवणीचा धडा देणारं एक संग्रहालय पुण्यामध्ये सुरु करण्यात आलं आहे. 25 नोव्हेंबर वास्वानी यांचा जन्मदिवस हा अंतरराष्ट्रीय स्तरावरही मांसाहार न करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.