लखनऊ : 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला एकामागे एक मोठे धक्के बसत आहेत. भाजप सोडून सपामध्ये काही मंत्र्यांनी प्रवेश केला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री दारा सिंह चौहान यांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादवही उपस्थित होते. आज अपना दलाचे आमदार आरके वर्मा यांनीही आपला पक्ष सोडून सपामध्ये प्रवेश केला.
युती झाल्यानंतर 80 टक्के लोक आमच्यासोबत येत आहेत. जे 20 टक्के लोक भाजपसोबत होते तेही आता आमच्यासोबत आले आहेत. याचा अर्थ असा की 100 टक्के लोक आमच्यासोबत आहेत. भाजप केवळ डॅमेज कंट्रोल करत असल्याचंही अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
भाजप विभाजनाचे राजकारण करत आहे. योग्य वेळी दारा सिंह समाजवादी पक्षात आले. खोटं सर्वेक्षण करून काहीही दाखवलं जातं. खोट्याच्या जोरावर भाजप काहीही करू शकते. निवडणुकीपूर्वी आमची बदनामी करण्यासाठी ते काहीही करतील. असा आरोप यावेळी अखिलेश यादव यांनी केला आहे.
'सबका साथ, सबका विकास' हा भाजपचा नारा होता. पण विकास काही मोजक्याच लोकांचा झाला.मागास समाजातील लोकांची फसवणूक आता चालणार नाही. सपामध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री दारा सिंह चौहान यांनी आपलं मत व्यक्त केलं.
5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये आता भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजप काय नवीन नियोजन करणार आणि पुन्हा उत्तर प्रदेशात कसं कमळ फुलवणार त्यासाठी कोणत्या नव्या उमेदवारांना संधी देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.