हरदोई : उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातून कोरोनाबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. येथे कोरोना विरुद्धच्या लढाईत 10 दिवसांच्या मुलाने मात केलीआहे. आठवड्याभरापूर्वी ग्रामस्थांना एक लहान बाळं झुडुपात पडलेले आढळले. या लहान बाळाला त्याच्या आईने जन्म देऊन झुडपात फेकले होते. ग्रामस्थांनी त्या नवजात मुलाला पाहिले, त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिस आणि चाईल्ड लाइनने नवजात मुलाला झुडपातून बाहेर काढले आणि जिल्हा महिला रुग्णालयाच्या एसएनसीयू वॉर्डमध्ये दाखल केले. जेथे डॉक्टरांनी मुलाची तपासणी केली. ज्यामध्ये मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मुलावर उपचार सुरू केले. 1 आठवड्यानंतर मुलाने कोरोनाविरूद्धची लढाई जिंकली आणि तो बरा झाला.
चाईल्ड लाइन जिल्हा कोऑर्डिनेटर अनूप तिवारी यांनी सांगितले की, 28 एप्रिल रोजी लोणार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुसळपूर गावामध्ये, झुडपात एक नवजात बाळ पडले होते. त्यानंतर त्यांची टीम घटनास्थळी पोचली आणि या नवजात बाळाला घेऊन आली. 2 दिवसानंतर बाळाची तपासणी केली गेली आणि त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.
मुलावर 10 दिवस उपचार केले गेले. मुलाला एसएनसीयूमध्ये ठेवले होते आणि त्याची देखरेख चाईल्ड लाइनकडून करण्यात आली. त्यानंतर 10 दिवसाने त्या बाळाने कोरोनावर मात केली. या मुलाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर त्याला लखनऊमधील बालगृहात पाठविण्यात आले आहे.