लखनऊ: उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना येथील राज्यकर्ते मात्र या वास्तवाचा स्वीकार करण्याऐवजी इतर गोष्टींनाच दोष देण्यात धन्यता मानत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री उपेंद्र तिवारी यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांच्या वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उपेंद्र तिवारी यांनी बलात्काराच्या घटनांच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बलात्काराचे वेगवेगळे प्रकार असतात, हे लक्षात घेतले पाहिजे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
एखाद्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला तर तो गुन्हा ठरतो. मात्र, आपण जेव्हा एखाद्या ३०-३५ वर्षांच्या महिलेवर बलात्कार झाल्याचे ऐकतो तेव्हा मनात काही शंका उपस्थित होतात. या महिलांचे सात-आठ वर्ष प्रेमप्रकरण असते. मग एके दिवशी त्या आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल करतात. या गोष्टींचा त्यांनी तेव्हाच विचार करायला पाहिजे होता, असे उपेंद्र तिवारी यांनी म्हटले. उपेंद्र तिवारी यांच्या या वक्तव्याची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.
दरम्यान, उपेंद्र तिवारी यांनी सरकार याकडे गंभीरपणे पाहत असल्याचेही सांगितले. शहरात कोठेही बलात्काराची घटना घडल्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याची माहिती घेतात आणि आरोपींविरोधात कठोरातील कठोर कारवाई करणं, ही सरकारची जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले.
#WATCH UP Minister Upendra Tiwari: Dekhiye rape ka nature hota hai, ab jaise agar koi nabalig ladki hai uske sath rape hua hai toh usko to hum rape manenge, lekin kahin-kahin pe ye bhi sunne ko aata hai ko ki vivahit mahila hai, umar 30-35 saal hai....uska alag-alag nature hai pic.twitter.com/Ou1AMPsvGB
— ANI UP (@ANINewsUP) June 9, 2019
काही दिवसांपूर्वीच अलीगढ येथे पैशांच्या वादातून अडीच वर्षांच्या बालिकेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तर शुक्रवारी खुशीनगर येथे एका १२ वर्षांच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या घटनेविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे.