UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) गोरखपूर शहरातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत आज योगी आदित्यनाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे.
गेल्या पाच वर्षांत योगी आदित्यनाथ यांच्या संपत्तीत सुमारे 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी त्यांच्या उत्पन्नातही सुमारे 57 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याची कमाई कमी होत आहे. मुख्यमंत्र्यांकडे घर, जमीन अशी कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. 2017 मध्ये त्याच्यावर चार खटले प्रलंबित होते. आता एकही केस नाही.
गोरखपूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संपत्तीत गेल्या चार वर्षांत सुमारे 59 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. एमएलसी म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची मालमत्ता 95.98 लाख रुपये होती, ती आता 1 कोटी 54 लाख, 94 हजार 54 रुपये इतकी झाली आहे. 2014 मध्ये खासदार असताना योगी यांची संपत्ती 72 लाख 17 हजार रुपये होती.
योगींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे दोन शस्त्र आहेत. यामध्ये एक लाख किमतीचं रिव्हॉल्व्हर आणि 80 हजार रुपये किमतीच्या रायफलचा समावेश आहे. योगी यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. त्यांच्याकडे रोख एक लाख रुपये, नवी दिल्ली एसबीआय संसद भवन शाखा इथं 25 लाख 99 हजार 171 रुपये, पीएनबीच्या औद्योगिक क्षेत्र गोरखनाथ शाखेत 4 लाख 32 हजार 751 आणि एसबीआयच्या गोरखनाथ शाखेत 7 लाख 12 हजार 636 रुपयांच्या चार एफडी आहेत. तर खात्यात 7,908 रुपये आहेत.
त्याचप्रमाणे SBI च्या लखनऊ इथल्या विधानसभा मार्गाच्या खात्यात 67 लाख 85 हजार 395 रुपये आणि पोस्ट ऑफिस, पार्लमेंट स्ट्रीट, नवी दिल्ली या खात्यात 35 लाख 24 हजार 708 रुपये आहेत. 2 लाख 33 हजार रुपयांचा विमा आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कानात 49 हजार रुपये किमतीची 20 ग्रॅमचं कुंडल, 12 हजार रुपये किमतीची दहा ग्रॅमची रुद्राक्ष असलेली सोन्याची चेन आहे. योगींकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. तसंच त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. 49 वर्षांचे योगी एचएन बहुगुणा विद्यापीठ श्रीनगर, पौडी गढवाल इथून विज्ञान (बीएससी) पदवीधर आहेत.
2014 पर्यंत योगींकडे तीन वाहनं
2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तीन वाहने होती. यामध्ये जुनी टाटा सफारी, इनोव्हा आणि नवीन फॉर्च्युनरचा समावेश आहे. त्यावेळी त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नव्हती.