Video : बुटाने तुडवले, छातीवर लाथ मारली; कौटुंबिक वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तीला पोलिसाकडून मारहाण

UP Crime : उत्तर प्रदेश पोलीस हे नेहमीच त्यांच्या चकमकीच्या कारवाईंमुळे चर्चेत असतात. आता एका व्यक्तीच्या बेदम मारहाण केल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यशैलीवर शंका उपस्थित केली आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 16, 2023, 02:42 PM IST
Video : बुटाने तुडवले, छातीवर लाथ मारली; कौटुंबिक वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तीला पोलिसाकडून मारहाण title=

Crime News : लोकांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस त्यांच्याच जीवावर उठत असल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातून (UP Crime) समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये (Ghaziabad) एका पोलीस हवालदाराने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. याप्रकरणी मारहाण केलेल्या हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून उत्तर प्रदेश पोलिसांच्या (UP Police) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

गाझियाबाद पोलिसांनी याप्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गाझियाबादच्या कर्पुरीपुरी येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच पोलीस कर्मचाऱ्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. व्हिडीओ आणि व्हिडीओ समोर येत आहेत आणि त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी लोक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

खाकी वर्दीच्या जोरावर कौटुंबिक वादात या पोलीस कर्माचाऱ्याने एका माणसाला बेदम मारहाण केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी त्या व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. ती व्यक्ती जमिनीवर पडते तरी पोलीस कर्मचारी त्याला मारणे थांबवत नाही. खाकीमुळे आजूबाजूचे लोकही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत.

व्हायरल व्हिडीओमध्ये मारहाण करणारी व्यक्ती ही पोलीस हवालदार रिंकू सिंग राजौरा असून तो मधुबन बापुधाम पोलीस ठाण्यात तैनात आहे. पोलिसाने केलेल्या मारहाणीमुळे पीडित व्यक्ती बेशुद्ध पडली होती. 14 ऑगस्ट रोजी गाझियाबादच्या कवी नगर पोलीस ठाण्याच्या परिसरात हा सगळा प्रकार घडला होता. माध्यमांच्या वृत्तानुसार, पीडित व्यक्तीचा काही गोष्टीवरून कौटुंबिक वाद झाला होता. तो सोडवण्यासाठी आलेल्या हवालदाराने काहीतरी मोठी गोष्ट घडल्यासारखे वातावरण तयार केले. यानंतर, पोलीस कर्मचाऱ्याने पीडित व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. पोलीस उपायुक्त निपुण अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. "मंगळवारी हा व्हिडिओ समोर आला होता. त्याची आम्ही दखल घेतली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत रिंकू सिंगला निलंबित करण्यात आले आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल. मारहाण झालेल्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. त्यामुळे आम्ही स्वतः एफआयआर नोंदवला आहे. राजौरा याच्याविरुद्ध कविनगर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 323, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असे पोलीस उपायुक्त निपुण अग्रवाल यांनी सांगितले.