परराज्यात अडकलेल्या मजुरांना परत आणणार- योगी आदित्यनाथ

देशातील इतर भागांमध्ये असणाऱ्या राज्यातील स्थलांतरीत मजुरांना टप्प्याप्प्याने त्यांच्या मुळ गावी, घरी आणलं जाणार आहे 

Updated: Apr 24, 2020, 08:30 PM IST
परराज्यात अडकलेल्या मजुरांना परत आणणार- योगी आदित्यनाथ title=

नवी दिल्ली: Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊननंतर त्याचे थेट पडसाद हे संपूर्ण देशात पाहायला मिळाले. ज्यामध्ये परराज्यांतील मजुरांच्या जीवनावर याचे परिणाम दिसून आले. याचाच उद्रेक मुंबईतील वांद्रे स्थानकापाशी झालेल्या तोबा गर्दीतही पाहायला मिळाला. ही एकंदर परिस्थिती पाहता आता आपल्या राज्यातील मजुर जे देशाच्या इतर भागांमध्ये आहेत, त्यांच्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

देशातील इतर भागांमध्ये असणाऱ्या राज्यातील स्थलांतरीत मजुरांना टप्प्याप्प्याने त्यांच्या मुळ गावी, घरी आणलं जाणार आहे असं शुक्रवारी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या एका आढावा बैठकीत आदित्यनाथ यांनी विविध राज्यांमध्ये अडकलेल्या अशा मजुरांची यादी तयार करण्याची विचारणा केली आहे. यामध्ये क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केलेल्या मजुरांनाही टप्प्याटप्प्याने परत आणलं जाणार असल्याची माहिती पीटीआयने प्रसिद्ध केली.

'उत्तर प्रदेश सरकार विविध राज्यांमध्ये अडकलेल्या आमच्या मजुरांना परत आणण्यात येणार आहे. ज्या मजुरांनी १४ दिवसांचा क्वारंटाईन काळ पूर्ण केला असल्यास त्यांना टप्प्याटप्प्याने राज्यात परत आणलं जाणार आहे', अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. क्वारंटाईन पूर्ण केलेल्या कामगारांची स्क्रीनिंग आणि चाचणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या गावी पाठवलं जाणार आहे. पण, त्यापूर्वी त्यांना चौदा दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाणार आहे. ज्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली असून, कामगारांना ठेवण्यात येणाऱ्या जागांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

उत्तर प्रदेशात राज्य शासनाकडून काही महत्त्वाची पावलं उचलली जाणार आहेत. ज्यामध्ये २० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येतील त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी जाऊन आरोग्य शिबीरं स्थापन करतील अशी माहितीही या आढावा बैठकीनंतर आदित्यनाथ यांनी दिली.