Seema Haider Case: भारतीय आणि पाकिस्तानी माध्यमांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर चर्चेत आहे. नोएडात राहणाऱ्या सचिनसोबत लग्न करण्यासाठी सीमा पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आली होती. त्यामुळं देशात मोठी खळबळ उडाली आहे. सीमा हैदर ही पाकिस्तानची जासूस आहे का? असा सवाल उपस्थित होत असतानाच उत्तर प्रदेशचे दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. सोमवारी एटीएसच्या पथकाने सीमा हैदरला ताब्यात घेतलं आहे.
सीमा हैदरकडे एकापेक्षा अधिक पासपोर्ट असल्याची बाब समोर आली आहे. तसंच, तिच्याकडे पाच फोनही सापडले होते. तेव्हापासून सीमा आयएसआयची जासूस असू शकते, अशा चर्चा रंगल्या आहेत. भारताचा व्हिजा नसतानाही सीमा देशात घुसली आहे. त्यामुळं या प्रकरणात आता एटीएसने उडी घेतली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने सचिनच्या राहत्या घरी धाड टाकली होती. त्यानंतर चौकशीसाठी सीमाला ताब्यात घेतले आहे.
सीमा हैदर भारतात कशी आली याबाबत चौकशी करण्यासाठी एटीएसच्या टीमने तिला ताब्यात घेतले आहे. आजच पथकाने ही तारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा हैदरच्या कॉल डिटेलची माहितीही काढण्यात येत आहे. तसंच, पाकिस्तानात ती कोणाच्या संपर्कात आहे का? याचाही तपास करण्यात येत आहे.
पाकिस्तानातील सिंध प्रांतात राहणाऱ्या सीमाची उत्तर प्रदेशातील नोएडा येथे राहणाऱ्या सचिनसोबत ओळख झाली. पबजी गेम खेळताना त्यांच्या प्रेम फुलले. दोघंही पहिल्यांदा नेपाळमध्ये भेटले होते. त्यानंतर नेपाळमधून भारतात आले. सीमा तिच्या चार मुलांना घेऊन भारतात आली आहे. भारतात आल्यानंतर दोघांना पोलिसांनी अटकही केली होती. मात्र नंतर दोघांना सोडून देण्यात आले होते. मात्र जशी या प्रकरणाची चर्चा झाली तेव्हापासून सीमाला परत पाकिस्तानात पाठवून द्यावे, अशी मागणी होत आहे.
सीमा हैदरवरुन दहशतवादी हल्ल्याची धमकीही देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्यानुसार, पाकिस्तानी महिला सीमा हैदरला जर पुन्हा पाकिस्तानात पाठवले नाही तर पुन्हा 26/11 सारखे हल्ले होतील. तसंच, फोन करणारा व्यक्तीही उर्दूतून बोलत होता. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.
सीमा हैदर प्रकरणामुळं दोन्ही देशात खळबळ उडाली आहे. सीमा आणि सचिनच्या प्रेमकहाणीची सोशल मीडियावरही चर्चा आहे. सीमा सध्या सचिनच्या घरी राहत असून तीने त्याच्याशी लग्न केल्याचा दावा केला जातोय. तसंच, सचिननेदेखील सीमासह तिच्या चार मुलांना स्वीकारले असल्याचे म्हटलं आहे.