कर्नाटक : कर्नाटक विधान परिषदेत आज अभूतपूर्व राडा झाला. विधान परिषद सभापतींविरोधातल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान हा गोंधळ एवढा विकोपाला गेला की भाजप आणि काँग्रेस आमदार एकमेकांना भिडले. सभागृह सभापतींना आमदारांनी खुर्चीवरून उचललं, आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. कॉलर पकडली. सत्ताधारी भाजपने विधानपरिषद सभापती प्रताप चंद्र शेट्टी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याच्या राज्यपालांच्या निर्देशानुसार एक दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं.
विधानपरिषदेत भाजपचं संख्याबळ कमी असल्यामुळे जेडीएसच्या साथीने भाजपने काँग्रेसच्या सभापतींना हटवण्याचा प्लॅन केला होता. अविश्वास प्रस्ताव मांडल्यामुळे विद्यमान सभापतींनी खुर्चीवर बसू नये अशी मागणी भाजप जेडीएसने केली होती. त्यांच्या जागी उपसभापती भौजेगौडा यांनी बसावं अशी मागणी करण्यात येत होती. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला आणि उपसभापतींना खुर्चीवरून काँग्रेस आमदारांनी उचललं.
त्यावरून नाराज झालेल्या भाजप आणि जेडीएसच्या आमदारांनी काँग्रेस आमदारांशी जोरदार धक्काबुक्की केली. त्यानंतर सभागृहात आलेल्या प्रतापचंद्र शेट्टी यांना खूर्चीपर्यंत पोहोचण्यास उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांच्यासह भाजप सदस्यांनी मज्जाव केला.
मार्शल्सनी यावेळी हस्तक्षेप करत सभापतींना खुर्चीपर्यंत नेलं. प्रताप चंद्र शेट्टी यांनी सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची घोषणा केल्यावर भाजप, जेडीएस आमदार संतापले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड राडा झाला.