नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार पीडितेने (Unnao rape case) शुक्रवारी रात्री दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात (Safdarjung Hospital) अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या वडिलांनी या प्रकरणी दोषी असलेल्या आरोपींना, हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना मिळालेल्या शिक्षेप्रमाणेच या आरोपींनाही शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. शुक्रवारी हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचं तेलंगाना पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आलं.
उन्नावमध्ये गेल्या वर्षी महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारपीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला. यात ती ९० टक्क्यांहून अधिक भाजली होती. त्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाला दहा दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता, तर दुसरा आरोपी फरार आहे. गुरुवारी सकाळी पाच जणांनी तिच्यावर हल्ला करून तिला पेटवून दिले होते. आरोपी तिच्या कुटुंबाला वारंवार धमकावत असल्याचे देखील समोर येत आहे.
रुग्णालयाकडून शुक्रवारी (६ डिसेंबर) रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी पीडितेचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. तिला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. शुद्धीत असेपर्यंत ती, आरोपींना सोडू नका असं सांगत होती. शुक्रवारी रात्री तिला कार्डियक अरेस्ट आला. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली.