Budget 2023 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाची विरोधक खासदाराने केली 'पठाण'शी तुलना; म्हणाला, "हे बजेट सर्व..."

Budget 2023 : आगामी लोकसभा निवडणुकांआधीचं मोदी सरकारचं हे अखेरचं बजेट असल्याने निवडणुकीची छाप असेल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला होता. अशातच विरोधकांनी निवडणूक समोर ठेवूनच हे बजेट सादर केल्याचे म्हटले आहे

Updated: Feb 1, 2023, 05:47 PM IST
Budget 2023 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाची विरोधक खासदाराने केली 'पठाण'शी तुलना; म्हणाला, "हे बजेट सर्व..." title=

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी पाचव्यांदा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यासोबत कर सवलत देऊन अर्थमंत्र्यांनी सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सात लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या सामान्यांना कर सवलतीतून सूट मिळणार आहे. तर दुसरीकडे निर्मला सीतारमण यांनी श्री अन्न योजना, पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेसह अनेक योजनांची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांनी या अर्थसंकल्पाला निवडणुकीला समोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प म्हटले आहे. 

एकीकडे टीका होत असताना विरोधी पक्षातील एका खासदाराने मात्र मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. शाहरुख खानच्या नुकत्याच आलेल्या 'पठाण' या (Pathan) चित्रपटाप्रमाणेच अर्थसंकल्प सुपरहिट ठरला आहे, असे या खासदाराने म्हटले आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. चार वर्षांनी पडद्यावर परतलेल्या शाहरुख खानला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या लोकप्रिय ठरत आहे. तसेच काहीच दिवसात या चित्रपटाने 360 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे याच चित्रपटाची चर्चा सगळीकडे आहे. 

देशाच्या अर्थसंकल्पातही पठाण चित्रपटाची छाप असल्याचे पाहायला मिळाले. बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) खासदार मलुक नागर (malook nagar) यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा दिल्याने तो चित्रपट शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटासारखा हिट झाला आहे, असे मलुक नगर म्हणाले. "सामान्य लोकांना दिलासा दिल्याने अर्थसंकल्प 'पठाण'सारखा हिट झाला आहे," असे उत्तर प्रदेशातील बिजनौरचे लोकसभा खासदार नागर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतूद का नाही?

राज्यातूनही या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. महाराष्ट्रासाठी कोणतीच घोषणा न केल्याने विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. "काही विरोधक सकाळपासून लिहून आले असतील की महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की, बजेटची फाईन प्रिंन्ट येईल तेव्हा त्यामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं हे कळतं. अलीकडच्या काळात राज्यानुसार घोषणा करणं बंद झालं आहे. बजेटच्या फाईन प्रिंन्टमध्ये ते असते. त्यामुळे ते न वाचता कुठल्याही प्रतिक्रिया देऊ नका हे विरोधकांना आधीच सांगतो," असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.