मुंबई : शिवसेनेचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन स्वत: अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, उद्धव यांनीही मोदी यांना फोनवरुन मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. त्याआधी मोदी यांनी माझ्या मोठ्या भावाला मी मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला बोलावणार असल्याचे म्हटले होते.
शिवसेना - भाजप युती तुटल्यानंतर महिन्याभराच्या सत्तासंघर्षानंतर अखेर राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाराष्ट्र विकासआघाडीचे नेते म्हणून ते आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. जवळपास २४ वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील.
महाराष्ट्र हा नेहमीच देशाला दिशा दाखवत आला आहे. नवे सरकार हे पाच वर्षांचा कार्यकाळ चांगल्या पद्धतीने पूर्ण करेल. आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनू नये यासाठी सर्व पर्याय वापरले गेले. परंतु आता हे सरकार स्थापन होणार आहे. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने त्यांनी 'सामना'चे संपादकपद सोडले आहे. 'सामना'ची जबाबदारी कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊतांकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आजचा 'सामना' प्रथमच ठाकरेविरहीत 'सामना' आहे. वृत्तपत्र नियमन कायद्यानुसार वृत्तपत्रातील मजकूराची जबाबदारी संपादकाची असते. त्यानुसार प्रत्येक वृत्तपत्राला आपल्या संपादकाचे नाव वृत्तपत्रात छापणे बंधनकारक आहे.