नवी दिल्ली : देशभरात विरोधक सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. बिहारमध्ये भारत बंदचा सर्वाधिक परिणाम पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. पण दुर्दैव म्हणजे जहानाबादमध्ये य़ा आंदोलनामुळे एका 2 वर्षाच्या मुलीला जीव गमवावा लागला आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे.
भारत बंदमुळे मुलीला रुग्णालयात आणण्यात उशिरा झाल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. रुग्णालयात मुलीला नेण्यासाठी लवकर गाडी न भेटल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे.
पण मुलीचा मृत्यू हा आजारपणामुळे झाल्याचं एस़डीओ यांनी म्हटलं आहे. मुलीला रुग्णालयात उशिरा आणण्यात आलं. मुलीला लवकर रुग्णालयात दाखल न केल्याने मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचं एसडीओंनी म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्षाने विरोधकांच्या या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुलीच्या मृत्यूमुळे विरोधी पक्षावर टीका केली आहे. हिंसा आणि मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे. त्यांनी म्हटलं की, 'आंदोलनात मेडिकल आणि रुग्णवाहिकेला नाही रोखलं जात. पण जहानाबादमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षाने रुग्णवाहिकेला जाऊ नाही दिलं. ज्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला.'