श्रीनगर : पुलवामा येथील टिकन गावात संरक्षण दलाने एकीकडे अतिरेक्यांविरुद्ध कारवाई सुरू ठेवली असताना, बारामुल्ला जिल्ह्यातील सिंहपुरा गावच्या मुख्य बाजारात दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात चार नागरिक जखमी झाले. बाजारपेठेत उभे असलेल्या संरक्षण दलावर ग्रेनेड टाकला गेला. पण तो त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. संरक्षण दलाने स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी हा ग्रेनेड हल्ला करण्यात आला. सिंहपोरा गावच्या मुख्य बाजारात जेव्हा संरक्षण दलाचं पथक उभं होतं तेव्हा अचानक स्फोट झाला. हल्लेखोर कोण होते हे कळाले नाही. त्यानंतर ग्रेनेड फेकणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी जवानांनी या भागाला वेढा घालण्यास सुरूवात केली आहे. एसओजी, सेना आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Jammu & Kashmir: Two unidentified terrorists killed in an encounter with security forces at Tiken area of Pulwama. Operations still underway. More details awaited.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/a7VFDynn1v
— ANI (@ANI) December 9, 2020
दुसरीकडे पुलवामाच्या टिकन गावात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. अजूनही काही अतिरेकी असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. संरक्षण दलाने येथे शोध मोहिम सुरु ठेवली आहे. गोळीबारात एक नागरिकही जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुलवामा येथे इंटरनेट सेवा बंद केली आहे.
या भागात दोन ते तीन दहशतवादी असल्याची माहिती सरंक्षण दलाला मिळाली होती. या भागात पोहोचताच वेढा घालून शोध मोहिम राबविली गेली. जवानांना जवळ येतांना पाहताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली. दहशतवाद्यांना शरण येण्याची संधीही दिली परंतु दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची ओळख पटलेली नाही, परंतु हे दोघे अल बद्र मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे असल्याचे सांगितले जात आहे.