धक्कादायक! गुजरातमध्ये कोरोनामुक्त झालेल्या दोन रुग्णांची टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह

त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले होते. 

Updated: Apr 23, 2020, 08:51 PM IST
धक्कादायक! गुजरातमध्ये कोरोनामुक्त झालेल्या दोन रुग्णांची टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह title=

अहमदाबाद: देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना चिंतेत भर टाकणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. गुजरातच्या पाटण जिल्ह्यात कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या दोन जणांची टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आली आहे. या दोघांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. यानंतर त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांचा होम क्वारंटाईनचा कालावधी काल संपुष्टात आला. त्यामुळे या दोन्ही रुग्णांची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात आली होती. आज त्याचा अहवाल समोर आल्यानंतर प्रशासनाला मोठा धक्का बसला.

३ मेपर्यंत भारतात कोरोना व्हायरसचा पीक पॉईंट येईल का?; ICMR म्हणते...
 
यापैकी पुरुष रुग्ण ६० वर्षांचा असून महिला रुग्णाचे वय ५५ इतके आहे. हे दोघेही सिधपूर येथील रहिवासी आहेत. या दोघांना आता पुन्हा पाटण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आठवडाभरापूर्वी पाटण जिल्हा रुग्णालयातून नऊ रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. त्यापैकी सात रुग्णांच्या पुन्हा घेण्यात आलेल्या कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आल्या आहेत. 

'भारतात अडीच महिन्यांचा लॉकडाऊन आवश्यक, नाहीतर अनर्थ ओढावेल'

याविषयी बोलताना पाटण जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मेहुल पटेल यांनी म्हटले की, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार झाल्यानंतर पुन्हा टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. कदाचित त्यांच्या नमुन्यांमध्ये कोरोनाचे मृत विषाणू आढळून आले असतील. त्यामुळेही टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. सध्या या दोन्ही रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांचे रक्ताचे अहवाल, एक्स-रे आणि इतर गोष्टी सामान्य आहेत. मात्र, नियमानुसार आम्हाला दोन्ही रुग्णांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले.