श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी आता महिला आणि मुलांनाही लक्ष्य करत आहेत. खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप जखमी झाल्याची घटना सलग दुसऱ्या दिवशी समोर आली आहे. एक दिवस आधी मंगळवारी दहशतवाद्यांनी एका कॉन्स्टेबलला लक्ष्य केले होते, ज्यात त्याची 9 वर्षांची मुलगी जखमी झाली होती.
आज एका टीव्ही अभिनेत्रीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये अभिनेत्रीचा 10 वर्षांचा पुतण्याही जखमी झाला, तर अभिनेत्रीचा मृत्यू झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दहशतवादी हल्ल्याची घटना बडगाम जिल्ह्यातील चादूरा येथील हिश्रू भागात घडली. अमरीनवर संध्याकाळी 7.55 च्या सुमारास गोळीबार करण्यात आला.
टीव्ही अभिनेत्री अमरीन तिच्या १० वर्षांच्या पुतण्यासोबत घराबाहेर उभी होती. त्यानंतर अचानक हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. हल्ल्यानंतर दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान अमरीनचा मृत्यू झाला. त्याचवेळी त्यांच्या पुतण्याच्या हातात गोळी लागली असून पुतण्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराची नाकेबंदी केली आहे.
मंगळवारीही दहशतवाद्यांनी 2 दहशतवादी घटना घडवून आणल्या होत्या. काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे पोलीस हवालदार सैफुल्लाह कादरी यांच्यावर गोळीबार झाला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांची 9 वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.
मंगळवारी झालेल्या दुसऱ्या हल्ला खोऱ्यातील कुलगाममध्ये झाला. जिल्ह्यातील यारीपोरा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला केला. या घटनेत 15 नागरिक जखमी झाले आहेत.