कमलनाथ सरकारला धोका : काँग्रेसच्या एका आमदाराचा राजीनामा, तीन आमदार कर्नाटकात?

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार हरदीप सिंग डंग यांच्या राजीनाम्याच्या बातम्यांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  

Updated: Mar 6, 2020, 09:49 AM IST
कमलनाथ सरकारला धोका : काँग्रेसच्या एका आमदाराचा राजीनामा, तीन आमदार कर्नाटकात? title=

भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार हरदीप सिंग डंग यांच्या राजीनाम्याच्या बातम्यांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास डंग यांनी मुख्यमंत्री कमलनाथ आणि विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र आपल्याकडे अजूनपर्यंत डंग यांचा राजीनामा आला नसून, यासंदर्भात हरदीप सिंग डंग यांच्यासोबत संवाद झालेला नाही, असे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हरदीपसिंग डंग यांच्यासह काँग्रेसच्या तीन आमदारांना भाजपने बंगळुरूत ठेवण्यात आले आहे. भाजपकडून मात्र हे वृत्त फेटाळण्यात आले आहे. 

दरम्यान, भाजपने मध्ये प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्याच्या बातम्या येत आहे. मात्र, भाजपने याचा इन्कार केला आहे.  तर दुसरीकडे काँग्रेसच्या एका आमदारांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. या आमदारासह तीन आमदारांना भाजपने बंगळुरुमध्ये हलविल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ सरकार धोक्यात असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसकडूनही भाजपवर आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहे, असा थेट आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. 

या सर्व घडामोडी पाहाता, मध्य प्रदेशात पुन्हा एकदा राजकीय बदल होणार का, याचीच चर्चा सुरु झाली आहे. कमलनाथ यांचे काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून व्युहरचना करण्यात येत आहे. त्यासाठी आमदार फोडण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे, तसा आरोप करण्यात आला आहे. याआधी कर्नाटक आणि गोवा राज्यात भाजपने आमदार फोडत काँग्रेसला दे धक्का देत आपले सरकार स्थापन केले आहे. आता मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी हालचाल सुरु केली आहे. तसा काँग्रेसने थेट आरोपही केला आहे. त्यामुळे भाजपचे सत्ता स्थापनेचे नवे मिशन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

भाजपने आठ आमदारांना गुरुग्रामच्या आयटीसी ग्रँड हॉटेलात लपवल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र हे आमदार पुन्हा काँग्रेसच्या संपर्कात आले. भाजपकडून  लपविण्यात आलेल्यांमध्ये काँग्रेसचे चार आमदार, बसपाचे दोन आणि एक सपाचा तर एक अपक्ष आमदाराचा समावेश होता.  भाजप मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्यासाठी आमदारांना पैशांचं आमिष दाखवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या आमदारांना काँग्रेस नेत्यांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप मध्यप्रदेशचे अर्थमंत्री तरुण भनोट यांनी केला होता. त्यामुळे भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले होते. मात्र, भाजपने हे सगळे आरोप फेटाळले आहेत. 

 दरम्यान कमलनाथ सरकारचे मंत्री जीतू पटवारी आणि मंत्री जयवर्धन सिंह यांनी रात्री उशीरा हॉटेलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसचा जीव भांड्यात पडला असताना नवे वृत्त हाती आले आहे. तीन आमदार बंगळुरुमध्ये भाजपने हलविल्याचे चर्चा आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव असल्याची राजकीय चर्चा सुरु आहे.