तिहेरी तलाक : राज्यसभेत आज सरकारची परीक्षा; निकालाकडे देशाचं लक्ष

काही दिवसांपूर्वीच लोकसभेत तिहेरी तलाकच्या विधेयकाला मंजुरी मिळाली होती, 

Updated: Jul 30, 2019, 07:57 AM IST
तिहेरी तलाक : राज्यसभेत आज सरकारची परीक्षा; निकालाकडे देशाचं लक्ष   title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुस्लिम समाजात तिहेरी तलाक (तलाक- ए- बिद्दत)वर बंदी आणण्याची मागणी करणारं मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) विधेयकाला सरकारतर्फे मंगळवारी राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. लोकसभेत या विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुले आता राज्यसभेत या विधेयकाच्या परीक्षेचा निकाल कसा लागतो याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं असेल. 

भाजपकडून या विधेयकाच्या निमित्ताने सर्व सदस्यांना मंगळवारी पूर्णवेळ राज्यसभेच्या सदनात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

राज्यसभेत या विधेयकाच्या वाटेत 'सपा'कडून अडथळा

राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकाचा विरोध करण्यासाठी समाजवादी पक्षाकडूनही पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्यासाठी सपाकडूनही सर्व सदस्यांनी विधेयक मांडलं जात असण्याच्या वेळी सदनात उपस्थित रहावं असे निर्देश दिले होते. सध्याच्या घडीला राज्यसभेत सपाचे एकूण १२ सदस्य आहेत. त्यामुळे या सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे. 

काही दिवसांपूर्वीच लोकसभेत तिहेरी तलाकच्या विधेयकाला मंजुरी मिळाली होती, ज्याचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी विधेयकाला राज्यसभेतूनही मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. पण, सध्याचं चित्र पाहता राज्यसभेत या एनडीएकडे बहुमत नसल्यामुळे या विधेयकाच्या वाटेत अडथळे आहेत. असं असलं तरीही भाजपकडून, फ्लोर मॅनेजमेंट या माध्यमातून तिहेरी तलाक विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळवून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.