लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर, काँग्रेस-तृणमूलचा विरोधानंतर सभात्याग

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. 

ANI | Updated: Jul 25, 2019, 08:32 PM IST
लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर, काँग्रेस-तृणमूलचा विरोधानंतर सभात्याग title=

नवी दिल्ली : तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकासाठी मतदान घेण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने ३०३ मते पडली तर विधेयकाच्या विरोधात ८२ मते पडली. दरम्यान, काँग्रेस, जेडीयू, तृणमूल काँग्रेसने जोरदार विरोध केला. आपला विरोध दर्शवत या पक्षांनी लोकसभा सभागृहातून सभात्याग केला. दरम्यान, मंजूर करण्यात आलेले तिहेरी तलाक विधेयक आता मंजुरीसाठी राज्यसभेत पाठविण्यात येणार आहे.

तिहेरी तलाक विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाली. आज गुरूवारी लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजुर करण्यात आले. दरम्यान या विधेयकाला विरोध दर्शवत जेडीयू, टीएसआर, वायएसआर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला. मंजूर करण्यात आलेले तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत पाठविण्यात येणार असले तरी कठीण आहे. मात्र, राज्यसभेत भाजपकडे बहुमत नाही.  

तत्पूर्वी विधेयकावर जोरदार चर्चा झाली. एमआयएमचे खासदार असादउद्दीनं ओवेसींनी हा कायदा मुस्लीम महिलांवर अत्याचार करणारा असल्याचा आरोप केला. या कायद्यातील पतीला अटक करण्याची तरतूद अन्यायकारक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तर भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी महिलांच्या सशक्तीकरणाचा मुद्दा मांडत ओवेसींना जोरदार उत्तर दिलं. तर शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिलांचे तारणहार संबोधून कृष्णाची उपमा दिली.

दरम्यान, पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्षे शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. तिहेरी तलाक विधेयकातील गुन्हेगारी कलम (क्रिमिनैलिटी क्लॉज) वादाचा मुद्दा बनला आहे. आता तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. अधिवेशनाचा कालावधी ७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे.