Trendin: तुम्ही कंपन्यांच्या चांगल्या आणि वाईट बॉसबद्दल ऐकले असेलच. अनेक बॉस आपल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्य मानतात आणि प्रत्येक क्षणी त्यांच्या पाठीशी उभे असतात. दुसरीकडे, काही बॉस कर्मचाऱ्यांवर त्यांचा राग काढतात. पण तुमच्या कर्मचार्यांची बिले भरण्यास मदत करणार्या बॉसबद्दल तुम्ही ऐकलं आहे का? असा बॉस शोधणं फार कठीण आहे. पण ब्रिटनमधील एका कंपनीतील बॉसनं वाढत्या वीज बिल पाहता ते भरण्यासाठी कर्मचाऱ्यांना दरमहा 18 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
डेली मेलनुसार, ब्रिटनची 4com कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर डॅरॉन हट यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. त्यांची उदारता पाहून लोक त्यांना जगातील सर्वोत्तम बॉस म्हणत आहेत. अहवालानुसार, डॅरॉन हट यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी फर्मचा एनर्जी सपोर्ट बोनस प्रोग्राम नुकताच सुरू केला आहे. त्यांच्या कंपनीत 431 कर्मचारी काम करतात. अडचणीच्या काळात सर्व कर्मचाऱ्यांना मदत करण्याचा निर्णय डॅरॉन यांनी घेतला आहे.
डॅरॉन हटच्या कंपनी 4com कंपनीच्या वतीनं दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वीज बिलाच्या वाढलेल्या किमती पाहता कंपनी कर्मचाऱ्यांना मदत करण्यास तयार आहे. कंपनी तात्काळ सपोर्ट बोनस कार्यक्रम सुरू करत आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना सपोर्ट बोनस दिला जाणार आहे. कंपनीच्या प्रत्येक कर्मचार्याला पुढील आदेश येईपर्यंत दरमहा £200 म्हणजेच सुमारे 18000 रुपये बोनस दिला जाईल.
ब्रिटनमधील नुकतंच वीज बिल वाढण्याचा इशारा देण्यात आला होता. लोकांना सांगण्यात आलं की त्यांच्या घरातील वीज बिल ऑक्टोबर महिन्यात £3,615 म्हणजेच सुमारे 3 लाख 42 हजारांपर्यंत जाऊ शकतं. कंपनीचं मुख्य कार्यकारी गॅरी स्कट म्हणाले की, प्रत्येक कर्मचारी कंपनीसाठी आवश्यक आहे. कर्मचारी ही आमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना हा बोनस देणार आहोत.