नवीन घर विकत घेण्यापूर्वी प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कसं होतं? जाणून घ्या प्रक्रिया

रजिस्ट्रेशन म्हणजेच तुम्ही मालमत्तेची मालकी बदलता. त्यानंतर त्या मालमत्तेवर तुमचा हक्क असू शकतो.

Updated: Aug 26, 2022, 03:19 PM IST
नवीन घर विकत घेण्यापूर्वी प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कसं होतं? जाणून घ्या प्रक्रिया title=

Property Registration: आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण अनेकदा घर खरेदी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं कळतं. त्यामुळे घर खरेदी करताना कागदपत्रं तपासणं महत्त्वाचं आहे. तसेच खरेदी व्यवहार झाल्यानंतर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. रजिस्ट्रेशन म्हणजेच तुम्ही मालमत्तेची मालकी बदलता. त्यानंतर त्या मालमत्तेवर तुमचा हक्क असू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडून कोणतीही जमीन विकत घेतली असेल, तर ती जमीन तुमच्या नावावर करण्यासाठी तुम्हाला प्रक्रियेतून जावे लागेल. या प्रक्रियेलाच रजिस्ट्रेशन म्हणतात. या प्रक्रियेअंतर्गत, तुम्हाला सध्याच्या मालकाऐवजी तुमच्या नावावर मालमत्ता होते. तुम्ही कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन करू शकता आणि कोणत्या कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागेल, जाणून घ्या.

मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासा

 तुम्ही मालमत्ता घेत असाल तर त्यावर कोणत्याही प्रकारची थकबाकी तर नाही ना, हे आधी तपासा. याचा अर्थ त्या मालमत्तेवर कोणतेही कर्ज, मालमत्ता कर किंवा कोणतीही थकबाकी नाही. रजिस्‍टर डीडनंतरच मालमत्तेचे कायदेशीररित्या हस्‍तांतरण केले जातं. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मालमत्तेची विक्री डीड किंवा गिफ्ट डीड नोंदवत नाही तोपर्यंत ते कायदेशीररित्या हस्तांतरित केले जात नाही. नोंदणी करण्यापूर्वी वकिलांचा सल्ला जरूर घ्या. यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळू शकता. याशिवाय रजिस्ट्रेशन संबंधित कायदेशीर समस्याही सहज समजू शकतात.

तुम्ही मालमत्तेची नोंदणी या पद्धतीने करू शकता

1. तुम्ही मालमत्ता खरेदी करता तेव्हा एक करार असतो. करारानुसार तुम्हाला विक्रेत्याला पैसे द्यावे लागतात. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या सेल डीडवर सही करावी लागेल.

2. यानंतर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी पेपर खरेदी करावा लागेल. स्टॅम्प ड्युटी पेपर तुम्हाला नोंदणीसाठी आवश्यक आहे. स्टॅम्प ड्युटी पेपरची किंमत राज्यानुसार बदलते.

3. यानंतर खरेदी विक्री संदर्भात कागदपत्र तयार केली जाताते. यात सध्याचे मालक आपली प्रॉपर्टी दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करत असल्याची माहिती दिली जाते.

4. नोंदणी प्रक्रियेसाठी तुम्हाला खरेदीदार आणि विक्रेत्यासह रजिस्ट्रार कार्यालयात जावे लागते. याशिवाय मालमत्तेच्या नोंदणीसाठी तुमच्यासोबत 2 साक्षीदारही असावे लागतात.

5. मालमत्तेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे आणि दोन्ही पक्षांच्या ओळखीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे निबंधक कार्यालयात ठेवली जातील. यानंतर ऑफिसमधून एक स्लिप दिली जाते, जी तुम्हाला सुरक्षित ठेवावी लागेल.

6. ही संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर, तुमच्या मालमत्तेच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर, तुम्हाला त्या मालमत्तेवर मालकी हक्क मिळतील.