अंत्यसंस्काराच्या 53 दिवसानंतर बँकेत दिसली ज्योती, 'लाडकी बहिण योजने'मुळे झाला उलगडा

मृत समजून महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण तीच महिला 53 दिवसानंतर जीवंत असल्याचं समोर आलं. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला पैसे काढताना दिसली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

राजीव कासले | Updated: Jul 3, 2024, 05:38 PM IST
अंत्यसंस्काराच्या 53 दिवसानंतर बँकेत दिसली ज्योती, 'लाडकी बहिण योजने'मुळे झाला उलगडा title=

Trending News : मृत समजून महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण तीच महिला 53 दिवसानंतर जीवंत असल्याचं समोर आलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. लाडकी बहिण योजनेमुळे (Ladali Bahena Scheme)  या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशमधल्या (Madhya Pradesh) भिंड जिल्ह्यातील मेहगाव इथे राहाणारी ज्योती शर्मा नावाची महिला 2 मे रोजी घरातून गायब झाली. ज्योती शर्माचा पती सुनील शर्माने ज्योतीच्या गायब होण्याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या दोन दिवसांनीच कतरोल गावातील एका शेतात महिलेचा मृतदेह आढळला. 

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी ज्योती शर्माच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांना बोलावलं. माहेरच्यांनी हा मृतदेह ज्योतीचाच असल्याचा दावा केला. पती सुनील शर्माने मात्र मृतदेह ज्योतीचा नसल्याचं सांगितलं. पण पोलीस आणि पत्नीच्या माहेरच्या लोकांच्या दबावामुळे पती सुनील शर्माने मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. इतकंच काय तर अस्थी विसर्जन आणि तेराव्याचा कार्यक्रमही पार पडला.

पतीवर हत्येचा आरोप
ज्योतीच्या हत्येला पती सुनील शर्मा जबाबदार असल्याचा आरोप ज्योतीच्या कुटुंबियांनी केला. कारण ज्या कतरोल गावात महिलेचा मृतदेह सापडला होता त्या गावात सुनील शर्माचे आई-बाबा राहातात. मृत महिलेची उंची आणि शरीरयष्टी ज्योतीशी मिळती-जुळती असल्याने तिच्या कुटुंबियांनी हा ज्योतीचा मृतदेह असल्याचं मान्य केलं होतं. ज्योतीच्या कुटुंबियांना मुलीच्या हत्येप्रकरणी सुनील शर्माविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पण पोलीस तपासात हत्येचे कोणतेही पुराव सापडले नाहीत. त्यामुळे पोलिसांबरोबच सुनील शर्माही ज्योती शर्माच्या शोधात लागले. 

ज्योती शर्मा बँकेत
ज्योती शर्माच्या हत्येचा शोध सुरु असतानाच 22 जून रोजी सुनील शर्मा बँकेत पैसे काढण्यासाठी गेला होता. पण काहीवेळापूर्वीच ज्योतीने खात्यातून 2700  रुपये काढल्याची त्याला माहिती मिळाली. ज्योती शर्माचं नाव मध्य प्रदेशमधल्या लाडली बहना योजनेत समाविष्ठ आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात ठराविक रक्कम जमा केली जाते. त्या अकाऊंटमधून ज्योतीने पैसे काढले होते. सुनील शर्माने बँक मॅनेजरकडून ज्योतीने बँकेच्या कोणत्या शाखेतून पैसे काढले याची माहिती घेतली.

नोएडातल्या कियोस्क सेंटरमधून ज्योतीने पैसे काढल्याची माहिती त्याला मिळाली. ही माहिती सुनील शर्माने पोलिसांना दिली. पोलिसांनी सुनील शर्माला सोबत घेत नोएडा गाठलं. कियोस्क सेंटरचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता दोन दिवसांपूर्वीच ज्योती पैसे काढत असल्याचं दिसली. यानंतर ज्योतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना नोएडातल्या एका फुटपाथवर ज्योती तुलटलेली चप्पल शिवून घेताना दिसली. पोलिसांनी तात्काळ तिला ताब्यात घेतलं. 

ती महिला कोण?
ज्योती शर्माला पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी ज्योती शर्मा समजून ज्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ती कोण? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. आता पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.