भारतातील हिमवाळवंटात अमेरिकन पॅराग्लायडरचा अपघाती मृत्यू; कडेकपारीतून मृतदेह काढताना ITBP ची दमछाक

Viral Video... पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या देशातील या हिमवाळवंटामध्ये कसा अडकला अमेरिकन पर्यटक? त्याचा वाईट अंत पाहून अनेकजण हळहळले...  

सायली पाटील | Updated: Jun 18, 2024, 09:52 AM IST
भारतातील हिमवाळवंटात अमेरिकन पॅराग्लायडरचा अपघाती मृत्यू; कडेकपारीतून मृतदेह काढताना ITBP ची दमछाक title=
Travel Lahaul Spiti Americal paraglider found dead near kaza itbo shares video

Himachal Pradesh Lahaul Spiti : हिमाचल प्रदेशातील अनेक गावखेड्यांना पर्यटकांच्या पसंतीमुळं एक वेगळाच बहर येताना दिसत आहे. मागील काही वर्षांमध्ये हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती या भागाला भेट देणाऱ्यांचा आकडा लक्षणीयरित्या वाढल्यामुळं हा भागही पर्यटकांच्या विशेष आवडीचा ठरत आहे. डोंगररांगा आणि भारतातील हिमवाळवंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पट्ट्यामध्ये मानवी जीवनाचा फार वार नसला, तरीही इथं बर्फ वितळल्यानंतर स्थानिक पुन्हा आपल्या घरांमध्ये येऊन पर्यटकांसाठी होम स्टे किंवा तत्सम सेवा सुरु करतात. ज्यामुळं स्पितीच्या खोऱ्यातील बहुतांश गावं आता प्रकाशझोतात येऊ लागली आहेत. 

काझामध्ये पॅराग्लायडरचा मृत्यू 

(Spiti Valley Kaza) स्पिती व्हॅलितील काझानजीक बेपत्ता झालेल्या 31 वर्षीय अमेरिकन पॅराग्लायडर बॉक्स्टाहलर ट्रेव्हरचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या 48 तासांहून अधिक वेळानंतर ITBP च्या गिर्यारोहकांनी सर्वाधिक काळ चाललेल्या सर्वात आव्हानात्मक बचाव मोहिमेनंतर 14,800 फुटांवरून मृतदेह खाली आणला. एसडीआरएफ आणि पोलिसांनी या मोहिमेत आयटीबीपीच्या तुकडीला मदत केली. ITBP नं या बचाव मोहिमेतील काही व्हिडीओ शेअर केले असून, ही मोहिम नेमकी किती आव्हानात्मक होती हे आता समोर आलं आहे. 

हा अमेरिकन पर्यटक गुरुवारी त्याच्या प्रवासादरम्यान बेपत्ता झाला गोता. यावेळी काझाच्या विविध भागांमध्ये त्याचा शोध घेण्याचं काम बचाव पथकांनी हाती घेतलं. यादरम्यान ताशीगंग इथं त्यांना एका निर्मनुष्य ठिकाणावर या पर्यटकानं भाडेतत्वावर घेतलेली मोटरसायकल आढळली. पण, त्याचा शोध मात्र लागू शकला नाही. पुढं लष्कराच्या डोगरा रेजिमेंटच्या मदतीनं ड्रोनचा वापर करत ताशीगंग भागात असणाऱ्या खोल दरीमध्ये बॉक्स्टाहलर ट्रेव्हरचा शोध घेण्यात आला. जिथं खडकाळ भागात छिन्नविछिन्न अवस्थेत एक पॅराशूट आढळलं आणि तपासाला वेग मिळताच पुढं त्याचा मृतदेह आढळला. 

हेसुद्धा वाचा : भटकंतीसाठी गेले अन् वाळवंटात अडकले! पाण्यासाठी वणवण करून शेवटी..; हेलिकॉप्टरने पोहोचलेलं बचाव पथकही हादरलं

 

अनोळखी आणि निर्मनुष्य ठिकाणी भटकंतीसाठी जात असताना अनेकदा त्या भागातील भौगोलिक रचना आणि हवामानाचा अंदाज पर्यटकांना नसतो. अशा वेळी कोणत्याही संकटसमयी मदतीसाठी स्थानिक यंत्रणा, बचाव पथकं यांचे संपर्क क्रमांक सोबत बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. याशिवाय अगदीच अनोळखी आणि निर्मनुष्य ठिकाणी जायचं झाल्यास स्थानिकांकडून त्या भागाची सखोल माहिती घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात करण्याता सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञ देतात.