स्पा, जिम आणि लग्जरी सुविधा असलेली ही रेल्वे पुन्हा होतेय सुरु, कोरोनामुळे होती बंद

कोरोनामुळे बंद असलेली ही अलिशान एक्सप्रेस पुन्हा होतेय सुरु.

Updated: Oct 11, 2022, 10:17 PM IST
स्पा, जिम आणि लग्जरी सुविधा असलेली ही रेल्वे पुन्हा होतेय सुरु, कोरोनामुळे होती बंद title=

मुंबई : दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा (Corona) सामना करणाऱ्या जनतेला आता हळूहळू दिलासा मिळाला आहे. अनेक गोष्टी पुन्हा एकदा सुरळीत सुरु झाल्या आहेत. त्यातच पर्यटकांची आवडती लोकप्रिय लक्झरी ट्रेन 'पॅलेस ऑन व्हील्स' पुन्हा एकदा रुळावर धावताना दिसणार आहे. राजस्थान पर्यटन विकास महामंडळ (RTDC) भारतीय रेल्वेच्या सहकार्याने ही रेल्वे चालवते. ही ट्रेन पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ही ट्रेन पुन्हा सुरू केली जाणार आहे.

पॅलेस ऑन व्हील्स जगभरात प्रसिद्ध आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पर्यटकांना याचा आनंद घेता येणार आहे. 'पॅलेस ऑन व्हील्स' ट्रेन गेल्या 40 वर्षांपासून लोकांना सेवा देत आहे.  1982 मध्ये देशातील पहिल्या लक्झरी हेरिटेज ट्रेनच्या संकल्पनेतून याची सुरुवात झाली होती.

राजस्थानचा वारसा आणि संस्कृती

ट्रेनचे इंटीरियर राजस्थानची संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. ही ट्रेन दिल्लीहून जयपूर, सवाई माधोपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर असा प्रवास करते. यावेळी आरटीडीसी या ट्रेनच्या गंतव्यस्थानांमध्ये आणखी काही ठिकाणे समाविष्ट करण्याचा विचार करत आहे.

या आलिशान ट्रेनचा प्रवास प्रत्येकालाच करायचा असतो, पण तिचं भाडं जाणून घेतल्यास कदाचित काही जणांना हिरमूड होऊ शकतो. कारण एका रात्रीसाठी ट्रेनमध्ये प्रवाशाचे भाडे 55 हजार रुपये आहे, ऑफ सीझनमध्ये ते सुमारे 43 हजार रुपये रअसते. त्याच वेळी, ट्रेनचे कमाल भाडे 1.54 लाख रुपये आहे. त्याच वेळी, 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ट्रेनमध्ये प्रवास विनामूल्य आहे. 5 ते 10 वयोगटातील मुलांकडून निम्मे भाडे आकारले जाते.

पर्यटन उद्योगावर कोरोनाचा मोठा परिणाम

हिवाळा येताच ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून राजस्थानमध्ये पर्यटन हंगाम सुरू होतो. गेल्या दोन वर्षांपासून राजस्थानचा पर्यटन उद्योग कोरोनामुळे वाईट अवस्थेतून जात आहे, परंतु यावेळी पर्यटनातून चांगली कमाई अपेक्षित आहे.