नवी दिल्ली: जगप्रसिद्ध 'टाईम' मासिकाच्या २० मे रोजीच्या अंकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील कव्हरस्टोरी सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. या अंकाच्या मुखपृष्ठावर नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असून त्यांचा उल्लेख 'डिव्हायडर इन-चीफ' असा करण्यात आला आहे. या अंकात मोदींवरील कव्हरस्टोरीसोबत 'मोदी द रिफॉर्मर' हा आणखी एक लेख छापून आला आहे.
तर आतिश तासीर यांनी लिहलेल्या कव्हरस्टोरीचे 'जगातील सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला पुन्हा संधी देईल का?' हे शीर्षक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. आतिश तासीर हे भारतीय पत्रकार तवलीन सिंग आणि पाकिस्तानातील दिवंगत उद्योगपती सलमान तासिर यांचे चिरंजीव आहेत. 'टाईम'च्या या कव्हरस्टोरीत आतिश यांनी भाजपचे हिंदुत्त्ववादी राजकारण आणि त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीत होणारे ध्रुवीकरण या मुद्यांवर भाष्य केले आहे. या सगळ्यामुळे भारतीय समाजात फूट पडत आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी 'सबका साथ सबका विकास' ही घोषणा देऊन सत्तेत आले. मात्र, सत्तेत आल्यानंतर त्यांनी पाच वर्ष फुकट घालवली. या लेखात गुजरातमधील दंगलीचाही उल्लेख आहे. मोदींनी पंडित नेहरू आणि त्यांच्या काळातील धर्मनिरपेक्षवादी आणि समाजवादी विचारसरणीवर प्रहार केला. तसेच त्यांनी भारताला काँग्रेसमुक्त करण्याची भाषा केली. तसेच मोदींनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बंधुभावाची भावना वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असे आतिश तासीर यांनी लेखात म्हटले आहे.
तर युरेशिया समूहाचे प्रमुख असलेल्या इयान ब्रेमर यांनी लिहलेल्या 'मोदी द रिफॉर्मर' या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे. भारताने मोदींच्या नेतृत्वाखाली चीन, अमेरिका आणि जपानशी असलेल्या संबंधांत सुधारणा केली. त्यांच्या देशांतर्गत आर्थिक धोरणांमुळे कोट्यवधी लोकांचे आयुष्य बदलले. मोदींनी भारताची करप्रणाली सरळ आणि सोपी केली आहे. गुंतवणूक, नवीन रस्ते, महामार्ग, सार्वजनिक वाहतूक, विमानतळ उभारणी यामुळे भारत प्रगतीपथावर वाटचाल करु लागल्याचे ब्रेमर यांनी लेखात नमूद केले आहे.