नवी दिल्ली : कोरोना व्हायरस विरूद्ध सुरू असलेल्या महायुद्धातील लॉक डाऊनचा आज चौथा दिवस आहे. यावेळी, सर्व देशवासीयांनी स्वत:च्या घरातच राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. काही लोकं लॉकडाउन अयशस्वी करण्याचा कट रचत आहेत. सोशल मीडियावर अशीच एक अफवा पसरली आणि याचा परिणाम म्हणून शनिवारी सायंकाळी हजारो लोक आनंद विहार बसस्थानकात दाखल झाले.
असे सांगितले जात आहे की सोशल मीडियातून कोणीतरी अशी भीती पसरविली होती की सरकारने लॉकडाऊनमध्ये 24 तासासाठी दिलासा दिला आहे. जेणेकरुन लोक कुठेही जाऊ शकतील. या अफवेने सोशल मीडियावर इतका जोर धरला की हजारो लोकं डोक्यावर बॅग घेऊन आनंद विहार बस तळावर पोहोचले. यामुळे देशाच्या राजधानीत लॉकडाउनची स्थिती बिघडली.
दिल्लीतील आयटीओ-विकास मार्गावरील लोकांशी बोलताना लक्षात आले की, टीव्ही आणि सोशल मीडिया पाहिल्यानंतर हे लोकं आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. त्यांनी सांगितले की सोशल मीडियावर हा संदेश येत आहे की दोन दिवस घरी जाण्याची वेळ असून सरकारने बसेसचीही व्यवस्था केली आहे.
लॉकडाऊन दरम्यान लोकांच्या जमावाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, तिथे हजारो लोकांची गर्दी पाहून पोलीसही चिंतेत पडले. संपूर्ण माहिती मिळाल्यावर पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला व त्यांना घरी परत जाण्याचे आवाहन केले. पण पोलिसांचे कोणीच ऐकले नाही.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परप्रांतीयांना जेथे आहेत तेथे रहाण्याचे आवाहन केले आहे. केजरीवाल म्हणाले की दिल्ली सरकारकडे अशी 800 केंद्रे आहेत जिथे लोकांना आहार देण्यात येत आहे. केजरीवाल म्हणाले, "लॉकडाऊनचं पालन करा. घराबाहेर पडू नका. हजरत निजामुद्दीन, शकूर बस्ती, आनंद विहार येथे जेवणाची व्यवस्था केली गेली आहे."