....हा फोटोच सारंकाही सांगतोय, दगडालाही पाझर फोडतोय

अव्यक्त तरीही बरंच काही सांगणारं नातं 

Updated: Nov 28, 2018, 01:46 PM IST
 ....हा फोटोच सारंकाही सांगतोय, दगडालाही पाझर फोडतोय  title=

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बऱ्याच फोटोंच्या गर्दीत सध्याच्या घडीला एक फोटो अनेकांच्याच काळजात चर्रsss करुन जात आहे. भारतीय सैन्यदल अधिकारी आणि एका शहीद सैनिकाच्या वडिलांमध्ये असणारं एक अव्यक्त तरीही बरंच काही सांगणारं नातं आणि भावना या फोटोतून व्यक्त झाल्याचं पाहायला मिळत आहेत. 

ADG PI - INDIAN ARMY च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये आपल्य़ा मुलाच्या म्हणजेच लांस नायक नाझिर अहमद वाणी यांच्या निधनाने गहिवरलेले त्यांचे वडील दिसत असून, सैन्यदल अधिकारी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. 

You are not alone असं त्या फोटोवर लिहिण्यात आलं असून, एका सैन्यदल अधिकाऱ्याच्या रुपात सगळ्यांनीच वाणी यांच्या कुटुंबाला आधार दिला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला हा फोटो पाहून अनेकांनाच गहिवरुन आलं आहे. शत्रूसमोर शस्त्र घेऊन लढा देणाऱ्या सैनिकाची ही भावूक बाजू पाहता खरंच दगडालाही पाझर फोडेल असाच तो क्षण होता. 

कोण होते लांस नायक नाझिर अहमद वाणी ? 

देशाच्या रक्षणासाठी म्हणून नाझिर यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. शोपिया येथे झालेल्या एका चकमकीत भारतीय सैन्याकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पण, त्यात वाणी यांना मात्र हौतात्म्य आलं. 

वाणी यांच्या बलिदानाला कोणीही विसरणार नाही. मुख्य म्हणजे देशाच्या संरक्षमार्थ झटणाऱ्या वाणी यांचा प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी. 

मुळच्या पुलगावच्या असणाऱ्य़ा वाणी यांनी सुरुवातीच्या काळात एका दहशतवादी संघटनेत प्रवेश केला होता. पण, वेळीच त्यांना या चुकीच्या मार्गाची जाणीव झाली आणि त्यांना हा मार्ग सोडला. 

सैन्यदलात प्रवेश करत २००४ मध्ये टेरिटोरियल आर्मीच्या १६२ व्या बटालियनमधून त्यांनी आपल्या देशसेवेच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक मोहिमांमध्ये सहभागी होत त्यांनी अल्पावधीतच आपलं वेगळेपण सिद्ध केलं. त्यांना दोनदा सेना मेडल देऊन गौरवण्यातही आलं होतं. 

राष्ट्रीय रायफल्सच्या बटालियनमध्ये असल्यामुळे ते नेहमीच दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहभागी असत. काही दिवसांपूर्वीच शोपिया येथे झालेल्या एका चकमकीत त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या बटालियनने तब्बल सहा दहतवाद्यांचा खात्मा केला. पण, अखेर काळाने त्यांच्यावर घाला घातला.