धमक्या, अर्वाच्य टिप्पणीनंतरही 'ती' पत्रकार डगमगली नाही

त्यांनी मात्र विरोधाचं चित्रीकरण करणं सुरुच ठेवलं.

Updated: Jan 4, 2019, 02:52 PM IST
धमक्या, अर्वाच्य टिप्पणीनंतरही 'ती' पत्रकार डगमगली नाही title=

मुंबई : केरळमध्ये शबरीमला येथे असणाऱ्या अय्यप्पा स्वामी मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन होणारा वाद दर दिवसागणिक चिघळत आहे. केरळमध्ये असणाऱ्या या मंदिरात दोन महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा विरोध करत काही हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेला तीव्र विरोध करणं सुरूच ठेवलं आहे. 

विरोधाच्या या सत्रात काही मंडळी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट होत आहे. सोशल मीडियावर सध्या शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाला होणाऱ्या विरोधाचं चित्रण करणाऱ्या एका महिला पत्रकाराची चर्चा सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून या महिला पत्रकाराचा विरोध होऊन, अर्वाच्य शब्दांत त्यांच्या टीकेचा सामना करावा लागला असूनही तिने मोठ्या धीराने परिस्थितीशी दोन हात केल्याचं पाहायला मिळालं. 

सोशल मीडियावर एक कार्यकर्ता 'कैराली टीव्ही'च्या शजिला अली फातिमा नावाच्या महिला कॅमेरामनला (पत्रकार) धमकावत असल्याचं दिसतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये शजिला अतिशय आक्रोशाने रडत याच विरोधाचं चित्रीकरण करत असताना दिसत आहेत. 

Dool Newsला दिलेल्या माहितीत आपण, माध्यमांवर हल्ला करणाऱ्या आणि फलक फाडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा हा गोंधळ चित्रीत करतेवेळीच त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचं शजिला म्हणाल्या. 

आपल्याला होणारा हा विरोध पाहूनही त्यांनी मात्र विरोधाचं चित्रीकरण करणं सुरुच ठेवलं. मी भाजप कार्यकर्त्यांना घाबरत नाही, मी त्यांचं हे विरोधसत्र चित्रीत करण्याचं माझं काम सुरूच ठेवणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, ज्या कार्यकर्त्याने शजिला यांच्याशी गैरवर्तणूक केली होती त्या कार्यकर्त्याने त्यांची माफी मागितल्याचंही कळत आहे. 

This Woman Cameraperson, Who Was Beaten Up By BJP Workers, Is Courage Personified

दोन महिलांनी शबरीमला मंदिरातील वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा मोडित काढत अय्यप्पा स्वामी मंदिरात आपली श्रद्धासुमनं अर्पण केली. ज्यानंतर वातावरण आणि महिलांच्या मंदिर प्रवेशास होणारा विरोध आणखीनच आक्रमक झाला. सध्याच्या घडीला या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी जवळपास ७४५ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे येत्या काळात हे वातावरण कधी शमणार याकडेच साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.