बेळगाव : कन्नड संघटनेचा तथाकथित नेता वाटाळ नागराज याने महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला आणि समितीच्या नेत्यांना तडीपार करा, अशी मागणी करून पुन्हा एकदा मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे .
महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात आले तर त्यांना अटक झाली पाहिजे असेही विधान वाटाळ नागराज याने केले आहे . बंगलोरहून आलेल्या कन्नड संघटनेच्या वाटाळ नागराज आणि प्रवीण शेट्टी यांनी मूठभर कार्यकर्त्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पोलीस संरक्षणात निदर्शने केली. यावेळी आंदोलकापेक्षा पोलिसांची संख्याच अधिक होती.
महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालावी आणि समिती नेत्यांना तडीपार करावे मागणीसाठी १२ जून रोजी संपूर्ण कर्नाटक बंद आंदोलन छेडण्याची वल्गनाही नागराज याने केली .
कर्नाटक सरकारने समितीवर कारवाई करावी आणि मराठीची मागणी करणाऱ्यांना येथून हाकला अशी हास्यास्पद मागणीही वाटाळ नागराज याने केली आहे. मूठभर कार्यकर्त्यांसह निदर्शने करून वाटाळ नागराज आणि प्रवीण शेट्टी यांनी आपले हसे करून घेतले आहे.