चीन, पाकिस्तानने घेतला या महाबलीचा धसका

पहा, कोण आहे हा महाबली?  

Updated: Jan 2, 2022, 07:52 PM IST
चीन, पाकिस्तानने घेतला या महाबलीचा धसका title=

चंदीगड : चीन आणि पाकिस्तानचे नापाक इरादे काही केल्या थांबत नाहीत. जेव्हा संधी मिळेल तेव्हा हे दोन्ही देश भारताच्या कुरापती काढतच असतात. पण, भारताच्या या नव्या महाबलीचा धसका या कुरापतीखोर देशांनी घेतला आहे.    

भारताला हा नवा महाबली मिळाला आहे रशियाकडून. रशियाच्या अल्माझ सेंट्रल ब्युरोने महाबलीचे डिझाइन बनवले आहे. भारत आणि रशियामध्ये 2018 मध्ये महाबलीच्या 5 युनिट्ससाठी करार झाला होता. ही संपूर्ण खरेदी 40 हजार कोटींची आहे. 

रशियन बनावटीचा महाबली जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण कवच मानलं जात आहे. S-400 ही ती हवाई संरक्षण प्रणाली आहे. ही प्रणाली हवेतून होणारे हल्ले रोखून शत्रू देशांचे क्षेपणास्त्र, ड्रोन, रॉकेट लॉन्चर आणि लढाऊ विमानांचे हल्ले रोखते.

ही यंत्रणा 400 किमी अंतरापर्यंत शत्रूची क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि विमाने हवेत नष्ट करू शकते. यात सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिकसह 4 प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा समावेश असून याद्वारे 400 किमीपर्यंतचे लक्ष्य सहज गाठता येते. 

S-400 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मोबाईलनेस. त्यामुळे महाबली रस्त्यावरून कुठेही नेता येते. यात 92N6E इलेक्ट्रॉनिक स्टीयर्ड फेज्ड एरो रडार बसवले आहे. ज्यामुळे किमान 600 किमी अंतरावरील लक्ष्य शोधून त्याचा वेध घेता येऊ शकतो. कमांड मिळाल्यानंतर 5 ते 10 मिनिटांत ही यंत्रणा आपले लक्ष्य साधण्यासाठी तयार होते हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

रशियाकडून भारताला मिळालेल्या यंत्रणेची रेंज 400 किमी आहे. हा महाबली 30 किमी उंचीवरही आपल्या लक्ष्यावर हल्ला करू शकते. यात एक रडार असून ते आपल्याभोवती एक सुरक्षा वर्तुळ बनवते. एखादे क्षेपणास्त्र किंवा अन्य शस्त्र या वर्तुळात प्रवेश करताच रडार ते शोधून काढते आणि कमांडट वाहनाला अलर्ट पाठवते. 

भारतीय हवाई दल पुढील महिन्यात पंजाबमधील एअरबेसवर पहिल्या तुकडीमध्ये सापडलेली यंत्रणा तैनात करणार आहे.  ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी आणखी किमान सहा आठवडे लागतील. हे क्षेपणास्त्र संपूर्ण पाकिस्तानी सीमा आणि उत्तर भागातील चीनच्या सीमेचा काही भाग व्यापेल अशा प्रकारे तैनात केले जात आहे. यामुळे चीन आणि पाकिस्तानचा कोणताही नापाक प्रयत्न हाणून पाडला जाणार आहे.