देशात कोरोनाच्या विस्फोटाला सुरूवात; आजच्या विक्रमी आकडेवारीने चिंता वाढली

देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवनवीन विक्रम गाठत आहे.

Updated: Apr 4, 2021, 10:30 AM IST
देशात कोरोनाच्या विस्फोटाला सुरूवात; आजच्या विक्रमी आकडेवारीने चिंता वाढली title=

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालायला सुरूवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवनवीन विक्रम गाठत आहे. गेल्या 24  तासात देशात तब्बल 93 हजार 249 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 513 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाख 91 हजारांवर गेली आहे. देशातील रुग्णवाढ एकाच दिवसात 90 हजाराच्या पार जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 

महाराष्ट्रात नवीन निर्बंध लागू शकतात

कोरोनाच्या उद्रेकांपैकी राज्यांत महाराष्ट्राचा (Maharashtra)नंबर सगळ्यात वरचा लागत आहे.  महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा नागरिकांना कडक लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. अशीच परिस्थिती वाढत राहिली तर साखळी तोडण्यासाठी दुसरा उपाय नसल्याने लॉकडाऊनचा पर्याय असल्याचे संकेत दिलेत.
 

कोरोना उद्रेकामुळे आरोग्ययंत्रणा व्हेंटिलेटरवर; राज्यात ऑक्सिजनच्या मागणीत चौपट वाढ

राज्यात दररोज सरासरी 40 हजार कोरोना रूग्णांची भर पडतेय. या वाढत्या रूग्णसंख्येनं एक नवी समस्या उभी केली आहे. ती म्हणजे ऑक्सिजनची. कोरोना रूग्णांना लागणा-या ऑक्सिजनच्या मागणीत चौपटीनं वाढ झाली आहे. 

राज्यात दररोज 1200 मेट्रीक टन ऑक्सिजन तयार होतो. त्यापैकी सामान्य परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रासाठी 150 ते 200 मेट्रीक टन ऑक्सिजन लागतो पण कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे हीच मागणी दररोज 700 मेट्रीक टनांपर्यंत वाढलीय. गेल्यावर्षी जेव्हा कोरोनाचे रुग्ण वाढले, त्यावेळी ही मागणी 600 मेट्रीक टनांपर्यंत गेली होती.

रूग्णवाढीची परिस्थिती अशीच राहिली तर राज्यात ऑक्सिजनची स्थिती गंभीर होऊ शकते. शिवाय हॉस्पिटलव्यतिरिक्त इतर उद्योगांनाही ऑक्सिजन लागत असल्यानं हे उद्योगही अडचणीत येऊ शकतात.