चांद्रयान 3 चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक; इस्रो कुठलीही कमांड देऊ शकणार नाही

चांद्रयान तीनचं काऊंटडाऊन सुरू झाले आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान 3 चे सॉफ्ट लँडिंग नियोजित वेळेनुसारच होणार असल्याची  इस्रोची माहिती, पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इस्रोच्या संपर्कात आहेत. 

Updated: Aug 22, 2023, 11:32 PM IST
चांद्रयान 3 चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक; इस्रो कुठलीही कमांड देऊ शकणार नाही title=

Chandrayaan-3 : चांद्रयान 3 चंद्रावर लँड करण्याचं काऊंटडाऊन सुरू झाले आहे. चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहेत. या 15 मिनिटांत जे घडेल त्यावर भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी होणार की नाही, ते ठरणार आहे.  संपूर्ण जगाचे लक्ष भाराताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मोहिमेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लक्ष ठेवून असणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते इस्रोच्या संपर्कात असतील. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी द.आफ्रिका दौ-यावर आहेत.  

चंद्राबरोबर तुमची अपॉईण्टमेंट फिक्स करुन टाका

23 ऑगस्ट...  संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटं... ही वेळ नक्की लक्षात ठेवा आणि चंद्राबरोबर तुमची अपॉईण्टमेंट फिक्स करुन टाका. कारण या क्षणाला भारत इतिहास लिहिणार आहे. याच वेळी चंद्रावर सूर्याचा प्रकाश पडणार आहे. चमचमत्या प्रकाशात लँडर विक्रम चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. आता तुम्ही जी दृश्यं पाहात आहात, असाच काहीसा नजारा 23 ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. लाखो आव्हानं आहेत. पण, त्यांचा सामना करायला चांद्रयान 3 सज्ज आहे. लँडर विक्रम पुढे सरकतंय आणि लँडरमध्ये असलेलं प्रज्ञान रोवरही चंद्रावर उतरण्याची वाट पाहतंय.  विक्रम आणि प्रज्ञानकडे भारताचंच नाही तर सगळ्या जगाचं लक्ष लागलंय. रशियाचं मिशन लूना नापास झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. 

चांद्रयान चंद्रावर लँड होण्याआधीची 15 मिनिटं अत्यंत महत्त्वाची

सध्या लँडर चंद्राच्या २५ किलोमीटरच्या परिघात प्रदक्षिणा मारत आहे.  चांद्रयान चंद्रावर लँड होण्याआधीची 15 मिनिटं अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. चांद्रयान चंद्राकडे झेपावल्यानंतर इस्रोचा त्याच्याशी संपर्क कायम आहे. मात्र, या शेवटच्या 15 मिनिटांत इस्रो कुठलीही कमांड देऊ शकणार नाही. चंद्रावर सुरक्षित सॉफ्ट लँडिग करण्याची जबाबदारी शेवटी लँडर विक्रमच्याच खांद्यावर असणार आहे. योग्य उंची ठेवून, योग्य प्रमाणात इंधनाचा वापर करण्याची जबाबदारीही लँडरची असणार आहे. विक्रम लँडरचे सेन्सर्स आणि दोन इंजिन्सनी काम करणं बंद केलं तरीही चंद्रावर सॉफ्ट लँडिंग शक्य होणार आहे. 

चंद्रावरच्या पृष्ठभागावर लँडिंगसाठी योग्य जागा निवडणं हे विक्रम लँडरसाठी मोठं आव्हान असणार आहे. ही निवड बरोबर झाली तर पुढची प्रक्रिया सोपी होईल. चांद्रयान २ मध्ये ज्या चुका झाल्या, त्या सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न इस्रोनं केलाय. चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचं काऊंटडाऊन सुरू झालंय... २३ ऑगस्टला अवकाशात नवा इतिहास लिहायला भारत सज्ज झालाय. त्याचे साक्षीदार व्हा.