'त्या' झडपेत चीनी कर्नल होता भारताच्या ताब्यात ?

 गलवान घाटीमध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली होती

Updated: Jun 21, 2020, 01:08 PM IST
'त्या' झडपेत चीनी कर्नल होता भारताच्या ताब्यात ? title=

नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या गलवान घाटीमध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली होती. यानंतर १० भारतीयांना चीनने सोडल्याचे वृत्त समोर आले होते. यावेळी भारतीय सैन्याने चीनच्या कर्नल रॅंकच्या अधिकाऱ्यास देखील ताब्यात घेतले होते अशी माहिती समोर येतेयं. भारतीय सैनिकांना सोडल्यानंतर या अधिकाऱ्यास पाठवण्यात आले. भारताने चीनचे सर्व सैनिक सोडले पण चीनने तसं केलं नसल्याचे केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंग यांनी म्हटले होते. यासंदर्भात अधिकृत स्टेटमेंट जाहीर करण्यात आले नाही. 

चीनसोबत झालेल्या झडपेत अनेत भारतीय सैनिक बेपत्ता असल्याचे म्हटले जात होते. पण भारतीय सैन्यातर्फे हे वृत्त फेटाळण्यात आले. गलवान घाटीमध्ये झालेल्या झडपेत कोणीही बेपत्ता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

'भारताकडून कधीच एलएसीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. बऱ्याच कालावधीपासून आम्ही या भागावर गस्त देत आहोत. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी सीमाभागात उभारलेल्या पायाभूत सुविधा भारताच्या बाजूच्या आहेत,' असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. 

मे २०२० पासूनच सीमेवर भारत नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत आहे, पण चीनकडून यामध्ये बाधा घालण्यात येत आहे. यामुळे सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. भारत परिस्थितीमध्ये एकतर्फी बदल करत असल्याचा आरोप आम्ही स्वीकारत नाही. आम्ही सीमेवर सगळ्या नियमांचं पालन केलं आहे. भारत आहे ती स्थिती कायम ठेवण्याच्या बाजूने आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

चीनने शुक्रवारी रात्री दिलेल्या वक्तव्यामध्ये गलवान खोऱ्यावर आपला अधिकार सांगितला होता. गलवान खोरं हे चीनचा भाग आहे आणि एलएसीच्या आमच्या बाजूला आहे. भारतीय सैनिक या भागात जबरदस्ती रस्ते आणि ब्रीज बांधत आहेत, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाऊ लिजियन म्हणाले.