देशातली मोठ्या टेलिकॉम कंपनीला टाळं... कर्मचारी हवालदिल

कर्मचारी मात्र हवालदिल झालेत. अधिकतर कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून पगारही मिळालेला नाही

Updated: Jun 6, 2018, 12:57 PM IST
देशातली मोठ्या टेलिकॉम कंपनीला टाळं... कर्मचारी हवालदिल title=

मुंबई : देशात रिलायन्स जिओच्या टेलिकॉम सेक्टर प्रवेशानंतर अनेक कंपन्यांना 'प्राईस वॉर'मध्ये दिवसा तारे दिसले... त्यातीलच एक कंपनी म्हणजे एअरसेल... या टेलिकॉम कंपनीला भारतात चांगलं मार्केट मिळालं होतं... पण आज ही कंपनी बंद पडलीय. या कंपनीचे उपभोक्ते दुसऱ्या कंपन्यांकडे वळवले गेले आहेत. परंतु, कर्मचारी मात्र हवालदिल झालेत. अधिकतर कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून पगारही मिळालेला नाही. आज परिस्थिती अशी आहे की कर्मचाऱ्यांवर शहर सोडण्याची वेळ येऊ ठेपलीय. 

इकोनॉमिक टाईम्समध्ये छापलेल्या बातमीनुसार, मार्चच्या शेवटी एअरसेलनं दिवाळखोरी जाहीर करत कामकाज बंद केलं. एअरसेलवर ५०,००० करोड रुपयांचं कर्ज आहे. या कंपनीत ३००० असे कर्मचारी आहेत ज्यांना मार्च महिन्यापासून पगार मिळालेला नाही. त्यांच्याकडे कोणतंही काम नाही. कर्मचारी कामावर तर जातात, एकमेकांना भेटतात आणि दुसरीकडे नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करतात. 

एअरसेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ आलीय की सध्या असलेल्या पगारापेक्षा २५ टक्के कमी पगारावरही ते दुसरीकडे काम करण्यास तयार आहेत.