पटना : चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना शिक्षा ठोठावण्यात आल्यावर त्यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) काय होणार? तसेच, बिहारचे राजकारण कोणते वळ घेणार याकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, हा मुद्दा निकाली निघाला आहे. लालूंच्या गैरहजेरीत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि लालू पूत्र तेजस्वी यादव हे पक्षाची सूत्रे सांभाळणार आहेत.
आरजेडीची एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत तेजस्वी यादव पक्षाची सूत्रे सांभाळतील यावर एकमत झाले. या बैठकीनंतर असेही बोलले जात आहे की, पक्षाच्या खूर्चीवर लालूंच्या पादूका ठेऊन अडचणीत सापडलेली नौका पार करण्याचा तेजस्वी पार करतील. दरम्यान, बिहारच्या राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, तेजस्वी हे लालूंच्या गैरहजेरीत पक्षाला गतवैभव प्राप्त करून देऊ शकतील. मात्र, पक्षातील आणि यादव कुटुंबियांतील सत्ताकलह संपवने हे त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असेन.
दरम्यान, लालूंच्या पत्नी राबडी देवी यांच्यावरही आरजेडीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अर्थात, राबडींकडे पक्षाची धुरा जाणे हे पहिल्यांदाच घडले नाही. कारण, यापूर्वीही लालू तुरूंगात गेले असताना आरजेडीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी राबडींवर सोपविण्यात आली होती. त्यावेळी राबडीदेवींनीही संकटात असलेला पक्ष अत्यंत कौशल्याने सांभाळला होता. मात्र, विद्यमान परिस्थिती वेगळी आहे. पक्षासमोर मोठी आव्हाने आहेत.
दरम्यान, लालूप्रसाद यादव हे तुरूंगात असले तरी, ते पत्राच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. पाटना येथे शनिवारी झालेल्या बैठकीत तेजस्वी यादव यांनी सांगितले की, लालू एक व्यक्ती नाही. ते विचारधारा आहेत. लालू प्रसाद यादव यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. हे पत्र प्रत्येक बिहारीपर्यंत पोहोचवले जाणार आहे. येत्या मकरसंक्रांतीनंतर आरजेडीचे नेते लालूंचा संदेश बिहारभर पोहोचवणार असल्याचेही तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.