तुम्ही पिताय तो चहा किती सुरक्षित? FSSAI ने देशाच्या विविध भागातून मागवले नमुने

FSSAI On Tea: FSSAI देशाच्या विविध भागातून गोळा केलेल्या नमुन्यांचे विश्लेषण करत आहे. तुम्ही पीत असलेल्या चहामध्ये सुरक्षा मानकांचे किती प्रमाणात पालन केले जात आहे? याची खात्री करणे हा त्याचा उद्देश आहे.

Pravin Dabholkar | Updated: Oct 8, 2023, 06:43 AM IST
तुम्ही पिताय तो चहा किती सुरक्षित? FSSAI ने देशाच्या विविध भागातून मागवले नमुने title=

FSSAI On Tea: देशातील चहाप्रेमींसाठी एक महत्वाची अपडेट आहे.येत्या काही दिवसात चहासंदर्भात काही महत्वाच्या घडामोडी घडलेल्या तुम्हाला दिसू शकतात. कारण देशाच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने आता चहाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार चहा आणि चहा पिणाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही महत्वाची पाऊले उचलली जाण्याची शक्यता आहे.एफएसएसएआयने का उचलले हे पाऊल? याचे काय परिणाम होऊ शकतात? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

 भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी चहा पिणारे अनेकजण सापडतील.  पण तुम्ही पीत असलेला चहा आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आहे का? भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने याच गोष्टीची (Tea Testing) चौकशी सुरू केली आहे. FSSAI देशाच्या विविध भागातून गोळा केलेल्या नमुन्यांचे विश्लेषण करत आहे. तुम्ही पीत असलेल्या चहामध्ये सुरक्षा मानकांचे किती प्रमाणात पालन केले जात आहे? याची खात्री करणे हा त्याचा उद्देश आहे.

कीटकनाशकांच्या अवशेषांच्या पातळीचे विश्लेषण 

समोर आलेल्या वृत्तानुसार,  अन्न सुरक्षा नियामकाने देशभरातील चहा उद्योगात सर्वेक्षण केले आणि नमुने गोळा केले आहेत. आता त्यामध्ये असलेल्या कीटकनाशकांच्या अवशेषांच्या पातळीचे विश्लेषण केले जात असल्याची माहिती FSSAI मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जी कमला वर्धन राव यांनी दिली.

ते म्हणाले की, आम्ही आमचे निष्कर्ष चहा उद्योगाला सांगू. तसेच FSSAI कडून चहा उत्पादक, व्यापारी आणि चहाच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत पुरवठा साखळीत सहभागी असलेल्या सर्वांना प्रशिक्षण दिले जाईल, असेही ते म्हणाले. FSSAI ने या प्रयत्नात 'चहा मंडळा'कडून सहकार्य आणि समर्थन देखील मागितले असल्याचे त्यांनी सांगितले.

चहा लिलाव केंद्रांवर चाचणी कार्यक्रम वाढले

राव यांनी शनिवारी टी बोर्डाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने चहा लिलाव केंद्रांवर चाचणी कार्यक्रम वाढवले ​​आहेत. अन्न सुरक्षा नियामक तात्पुरत्या चाचणी प्रयोगशाळांची संख्या सध्या 220 आहे. यात देखील वाढ केली जात आहे.