ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर; लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Crime News : तमिळनाडूमध्ये एका ईडीच्या अधिकाऱ्याला लाखोंची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तपासात हा अधिकारी लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे समोर आलं आहे. तमिळनाडू पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 2, 2023, 09:02 AM IST
ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर; लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं title=

Crime News : देशातल्या आर्थिक गुन्हेगारीविरुद्ध गेल्या काही वर्षांपासून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बऱ्याच कारवाया केल्या आहेत. ईडीने असे गुन्हे करणाऱ्या अनेकांना तुरुंगात धाडलं आहे. मात्र आता ईडीच्याच (ED) अधिकाऱ्याने लाच घेतल्याचे समोर आलं आहे. अधिकाऱ्यांनी ईडी अधिकाऱ्याला लाखोंची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. आठ किलोमीटरपर्यंत पाठलाग करत या ईडी अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. लोकांना धमकावून त्यांच्या पैसे घेणाऱ्या या अधिकाऱ्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे.

तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) एका सरकारी अधिकाऱ्याकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अंकित तिवारी असे या ईडीच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने आरोपी अंकित तिवारीला अटक केली आहे. आरोपी अंकित तिवारी त्याच्या ईडी पथकासोबत अनेक लोकांना धमकावत होता आणि ईडीच्या केस बंद करण्याच्या नावाखाली लाच घेत होता, असा आरोप आहे. अटकेनंतर अंकित तिवारीच्या संबधित सर्व प्रकरणांचा आता शोध घेण्यात येत आहे.

तामिळनाडू पोलिसांनी तिवारीच्या कारचा दिंडीगुल-मदुराई महामार्गावर आठ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्याला अटक केली. आरोपीला 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेनंतर अंकित तिवारीच्या दिंडीतील घरावर छापा टाकण्यात आला. तपासात आता मदुराई आणि चेन्नईतील अनेक ईडी अधिकारीदेखील या प्रकरणात सामील असल्याचे उघड झालं आहे. अंकित तिवारी अनेकांना ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये उकळत होता. त्याने ही लाचेची रक्कम ईडीच्या इतर अधिकाऱ्यांमध्ये वाटून घेतली होती.

अंकित तिवारीने 29 ऑक्टोबर रोजी दिंडीगुलच्या एका सरकारी कर्मचाऱ्याशी चौकशी करण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र ते प्रकरण बंद झाल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. त्यावर तिवीरने पीएमओने ईडीला या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे, असे सरकारी कर्मचाऱ्याला सांगितले. अंकित तिवारीने कर्मचाऱ्याला 30 ऑक्टोबरला मदुराई येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. कर्मचारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचला तेव्हा अंकित तिवारीने त्याच्याकडे तपास थांबवण्यासाठी 3 कोटी रुपयांची लाच मागितली. त्यानंतर आपण अधिकाऱ्यांनी बोलून ही रक्कम  51 लाखांवर आणल्याचे सरकारी कर्मचाऱ्याला सांगितले.

1 नोव्हेंबर रोजी सरकारी कर्मचाऱ्याने अंकित तिवारीला 20 लाख रुपये दिले. यानंतर तिवारीने ही रक्कम बड्या अधिकाऱ्यांमध्ये वाटून दिली जाईल, असे सांगून संपूर्ण रक्कम देण्यास सांगितले. वेळेवर पैसे न दिल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही अंकित तिवारीने दिला. अंकित तिवारीच्या वागण्यावर शंका आल्याने सरकारी कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती. त्यानंतर अंकित तिवारीच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला. 1 डिसेंबर रोजी अंकित तिवारीला आणखी 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.