भारतीय संस्कृतीच्या प्रतिनिधी सुषमा स्वराज...

सुषमा स्वराजांचा करारी स्वभाव जेवढा लोकांच्या लक्षात राहिला तेवढ्यात त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. अतिशय साधेपणानं राहणाऱ्या सुषमा जणू भारतीय संस्कृतीच्या प्रतिनिधी होत्या. 

Updated: Aug 7, 2019, 07:29 PM IST
भारतीय संस्कृतीच्या प्रतिनिधी सुषमा स्वराज... title=

मुंबई : सुषमा स्वराजांचा करारी स्वभाव जेवढा लोकांच्या लक्षात राहिला तेवढ्यात त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. अतिशय साधेपणानं राहणाऱ्या सुषमा जणू भारतीय संस्कृतीच्या प्रतिनिधी होत्या. 

कपाळावर ठसठशीत कुंकवाचा टिळा..... साडी... अंगावर शाल आणि चेहऱ्यावर स्मित... आपल्या कामात सुषमा स्वराज जेवढ्या कुशल होत्या, तेवढं त्यांचं आयुष्यही सरळ आणि साधं होतं. सुषमांच्या आयुष्यातला क्षण आणि क्षण भारतीय संस्कृतीशी जोडलेला असायचा. सुषमा स्वराज धार्मिक होत्या. कोणताही रितीरिवाज पाळण्यात त्या मागं नसायच्या. प्रत्येक सण त्या उत्साहात साजरा करायच्या. या सगळ्या सणांमध्ये खास सण असायचा करवा चौथ. प्रत्येक वर्षी सवाष्ण महिलांसह त्या उत्साहात करवा चौथचं व्रत करायच्या. त्यांच्या घरी करवा चौथच्या कार्यक्रमाचा डामडौल पाहण्यासारखा असायचा. 

व्रत करताना प्रत्येक रितीरिवाज पाळलाच जाईल याकडं त्याचा कटाक्ष असायचा. सुषमा स्वराज करवा चौथची कथा सगळ्या महिलांसोबत बसून ऐकायच्या. सोळा शृंगार करुन करवा चौथची पूजा करणाऱ्या सुषमा स्वराज यांचे फोटोंची समाज माध्यमांवर नेहमी चर्चा व्हायची.

मागच्या वर्षी सुषमा स्वराज यांनी स्वराज कौशल यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. सुषमा स्वराज यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुषमा स्वराज रोज वेगळ्या रंगाची साडी परिधान करायच्या. सुषमांना भारतीय संस्कृतीच्या अतिशय अभिमान होता. ज्योतिष आणि रत्नांवर त्यांचा विश्वास होता. त्यामुळंच त्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या साडी परिधान करायच्या. जेवणातही त्या वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या खायच्या.

पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या सुषमा स्वराज यांनी हिरवी साडी नेसली होती. त्यामुळं वाद निर्माण झाला होता. प्रत्येक बुधवारी आपण हिरवी साडी नेसतो असं त्यांना संसदेत सांगावं लागलं होतं.

सुषमांचं हे वेगळेपण खाण्यापिण्यातही दिसायचं, बुधवारी त्या कोथिंबिर टाकलेली डाळ खायच्या. सुषमांची देवावर अपार श्रद्धा होती. त्यांनी देवाप्रती असलेली श्रद्धा कधीही लपवून ठेवली नाही. सुषमा जेव्हा परदेश दौऱ्यावर जायच्या तेव्हा त्या तिथल्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये जायच्याच. सुषमा स्वराज शिवभक्त होत्या. परराष्ट्रमंत्री असताना कैलास मानसरोव यात्रेसाठी भक्त रवाना होताना परराष्ट्र मंत्रालयातलं वातावरणही भक्तीमय झालं होतं. एकदा तर एका पत्रकार परिषदेदरम्यान त्या भजन गुणगुणताना दिसल्या होत्या.