मृत्यूआधी सुषमा स्वराज यांचं शेवटचं ट्विट

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं आहे.

Updated: Aug 7, 2019, 12:02 AM IST
मृत्यूआधी सुषमा स्वराज यांचं शेवटचं ट्विट title=

नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं आहे. मंगळवारी रात्री ९.०० वाजल्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्यांना तातडीन रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मृत्यू व्हायच्या काही तास आधीच म्हणजेच ७ वाजून २३ मिनिटांनी सुषमा स्वराज यांनी ट्विट केलं होतं. मोदी सरकारचं कौतुक करणारं सुषमा स्वराज यांचं हे ट्विट दुर्दैवाने अखेरचं ठरलं.

राज्यसभेनंतर लोकसभेमध्ये जम्मू-काश्मीरसाठीचा अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द करण्यात आला. यानंतर सुषमा स्वराज यांनी हे ट्विट केलं. 'मी पंतप्रधानांचं अभिनंदन करते. मी माझ्या आयुष्यात हा दिवस पाहण्याची वाट बघत होते,' असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलं होतं.

सुषमा स्वराज यांची उत्तुंग कारकिर्द

सुषमा स्वराज यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून सुषमा स्वराज राजकारणात आल्या. समाजवादी चळवळीतून त्या भाजपमध्ये आल्या. १९७७ साली सुषमा स्वराज हरियाणाच्या विधानसभेत पोहोचल्या. १९७७-७९ या कालावधीत त्या हरियाणामध्ये मंत्री राहिल्या. १९९८ साली त्या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या. यानंतर २००९ ते २०१४ साली त्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या. २०१४ साली त्या देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री झाल्या. तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी २०१९ सालची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. 

सुषमा स्वराज या पेशाने सर्वोच्च न्यायालयाच्या वकील होत्या. उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं. फक्त विरोधी पक्षात असतानाच नाही तर मंत्री असताना आणि संयुक्त राष्ट्रामध्येही सुषमा स्वराज यांनी केलेली भाषणं गाजली होती. सुषमा स्वराज या हरियाणा हिंदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षही होत्या.