संसदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून विरोधकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतून आज 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे सोमवारी लोकसभेतील 33 आणि राज्यसभेतील 45 अशा एकूण 78 खासदारांवर करण्यात आली होती. आतापर्यंत अधिवेशनात एकूण 141 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
Union minister Arjun Ram Meghwal in Lok Sabha proposes to suspend more Opposition MPs including Supriya Sule, Manish Tewari, Shashi Tharoor, Md Faisal, Karti Chidambaram, Sudip Bandhopadhyay, Dimple Yadav and Danish Ali pic.twitter.com/vHlNsMh2Oh
— ANI (@ANI) December 19, 2023
निलंबित खासदारांमध्ये वैद्यलिंगम, गुरजीत औजला, सुप्रिया सुळे, सत्यगिरी, अदूर प्रकाश, मनीष तिवारी, प्रद्युत बोरदोलोई, गिरीधारी यादव, गीता कोरा, फ्रान्सिस सरदेन्हा, जगत्रक्षणम, पार्थिबन, फारुख अब्दुल्ला, ज्योत्स्ना महंत, अ गणेशमूर्ती, गणेशमूर्ति, माला रॉय, अ वेलुस्वामी, चंद्रकुमार, शशी थरुर, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव, दानिश अली, टीएनव्ही सेंथिल कुमार, खैलदूर रहमान, संतोष कुमार, दुलाल चंद्र गोस्वामी, नवनीत बिट्टू, दिनेश यादव यांचा समावेश आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेच्या कामात व्यत्यय आणल्याने तसंच असभ्य वर्तनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संसदेचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी ही कारवाई केल्याचं सांगत सरकारने समर्थन केलं आहे. तर दुसरीकडे विरोधक मात्र टीका करत आहेत.
संसदेतील सुरक्षाभंग प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय कामकाज चालू न देण्याचा इशारा 'इंडिया आघाडी'ने दिला आहे. यावरुन दोन्ही सभागृहांमध्ये सुरु असलेल्या गदारोळामुळे खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये दिवसभराच्या गदारोळानंतर झालेल्या अभूतपूर्व कारवाईमध्ये सोमवारी लोकसभेतील 33 आणि राज्यसभेतील 45 अशा विरोधी पक्षातील एकूण 78 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. या कारवाईमुळे कारवाई करण्यात आलेल्या 'इंडिया' आघाडीतील खासदारांची संख्या 92 वर पोहोचली होती. सभागृहातील कामकाजामध्ये विरोधी खासदारांनी प्रक्रिया नियमांचा भंग केला आहे. तसंच त्यांचे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह व असभ्य असल्याची कारणे देत लोकसभेमध्ये संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी तर राज्यसभेमध्ये सभागृह नेते पीयुष गोयल यांनी विरोधी खासदारांच्या निलंबानाचे प्रस्ताव मांडले होते. हे प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले होते.