नवी दिल्ली : अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या ट्रिपल तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांचं खंडपीठ आज सकाळी साडेदहाच्या सुमारास या प्रकरणी निकाल देण्याची शक्यता आहे. मे २०१७ मध्ये ११ ते १८ तारखेदरम्यान सलग सात दिवस सुप्रीम कोर्टात ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या समोर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने १८ मे रोजी निर्णय राखून ठेवण्यात आला होता.
सकाळी १०.३० वाजता निर्णयाचं वाचन सुरू होणार आहे. ट्रिपल तलाकविषयी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करताना सरकारने प्रथा अवैध ठरवली होती. तसेच सरकार ही 'कुप्रथा' सुरू ठेवण्याच्या बाजूने नसल्याचेही सांगण्यात आलं होतं.
तर ट्रिपल तलाकवर बंदी म्हणजे धर्मावर अतिक्रमण आहे. त्यामुळे धर्मिक बाबातीत सरकारचा हस्तक्षेप असल्याचं मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचं मत आहे. भारतातील एकंदरीत राजकारणाला वेगळं वळण देणारा, असा हा निर्णय असल्याने याचं महत्त्व अधिक वाढलं आहे.
महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा हा निर्णय असल्याने मुस्लीम समाजातील महिलांसह अवघ्या देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागलंय.