'त्या' कामगारांचा जीव वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका

मेघालयात गेल्या २२ दिवसांपासून १५ कामगार अवैध कोळशाच्या खाणीत अडकलेत 

Updated: Jan 3, 2019, 12:00 PM IST
'त्या' कामगारांचा जीव वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका title=

नवी दिल्ली : मेघालयाच्या जयंतिया हिल्स जिल्ह्यात कोळशाच्या खाणीत अडकलेल्या १५ कामगारांचा जीव वाचवण्यासाठी आता थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागलेत. आज या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या कामगारांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून योग्य आणि त्वरीत पावलं उचलण्याची मागणी करत एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. 

बुधवारी वरिष्ठ वकील आनंद ग्रोवर यांनी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे या जनहीत याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी निर्धारित करण्यात आली. 

२२ दिवसांपासून कामगार खाणीत अडकलेत

१३ डिसेंबर रोजी एका 'अवैध' कोळशाच्या खाणीत जवळपास २० कामगार घुसले होते. एका निमुळत्या सुरुंगातून हे सर्व जण आत घुसले... परंतु, एकाच्या चुकीमुळे नदीजवळचा बांध तुटला आणि सुरुंगात पाणी भरलं... त्यानंतर या सुरुंगातून सुखरूप बाहेर पडण्यात पाच कामगार यशस्वी ठरले पण गेल्या २२ दिवसांपासून बाकीचे १५ कामगार या सुरुंगातच अडकलेल्या अवस्थेत आहेत. 

या खाणीत अडकलेल्या १५ कामगारांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची एक टीम इथं उपस्थित आहे. जवळपास ७० अधिकारी कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. एनडीआरएफनं स्थानिक प्रशासनाकडे कमीत कमी १०० - एचपी पंपाची मागणी केली होती. परंतु, प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे अद्याप कोणतंही पाऊल उचलण्यात आलेलं नाही. 

एनडीआरएफ टीमच्या हाती अद्याप केवळ तीन जणांचे हेल्मेट लागलेले आहेत. ३०० फूट खाणीत अडकलेल्या कामगारांची कोणतीही माहिती अद्याप हाती आलेली नाही.